बलाढय़ रिअल माद्रिद संघाने सलग तिसऱ्या वर्षी उपांत्य फेरीत मजल मारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात रिअल माद्रिद संघाने घरच्या मैदानावर गलाटासारे संघाचा ३-० असा सहज पराभव केला आहे. अन्य सामन्यांत, मलगाने बोरूसिया डॉर्टमंड संघाला गोलशून्य बरोबरीत रोखत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत राखल्या आहेत.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने रिअल माद्रिदला शानदार सुरुवात करून दिली. मेसूत ओझिलकडून मिळालेल्या पासवर रोनाल्डोने नवव्या मिनिटालाच रिअल माद्रिदचे खाते खोलले. करीम बेन्झेमाने २९व्या मिनिटाला गोल करून रिअल माद्रिदची आघाडी २-० अशी वाढवली. ७३व्या मिनिटाला गोन्झालो हिग्युएन याने हेडरद्वारे केलेल्या गोलाच्या बळावर रिअल माद्रिदने सहज विजयाची नोंद केली. ओझिलने मधल्या फळीत केलेल्या सुरेख कामगिरीमुळेच माद्रिदला हा विजय साकारता आला. गलाटासारेचे वेस्ली श्नायडर, दिदियर द्रोग्बा आणि बुराक यिल्माझ हे अव्वल खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले.
मलगाचा गोलरक्षक विली कॅबालेरोने सुरेख कामगिरी करत संघाला आगेकूच करण्याची संधी दिली आहे.  दोन्ही संघांनी गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण एकाही संघाला अखेपर्यंत गोल झळकावता आला नाही. पहिल्या सत्रात बोरूसिया डॉर्टमंडच्या मारियो गोएट्झे याने दोन वेळा गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. पण त्याला कॅबालेरोचा भक्कम बचाव भेदता आला नाही.

Story img Loader