क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ का आहे, याची प्रचिती रिअल माद्रिद आणि अॅटलेटिको माद्रिद यांच्यातील लढतीने संपूर्ण जगाने अनुभवली. चॅम्पियन्स लीगमधील या चित्तथरारक लढतीने फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सर्वानाच मंत्रमुग्ध केले. अतिरिक्त वेळेत गॅरेथ बॅले, मार्सेलो आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी केलेल्या गोलांच्या बळावर रिअल माद्रिदने अॅटलेटिको माद्रिदचा ४-१ असा पराभव करून दहाव्यांदा चॅम्पियन्स लीग चषकाला गवसणी घातली.
एकाच शहरातील दोन संघ चॅम्पियन्स करंडकासाठी आमने-सामने उभे ठाकल्यानंतर त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळाची अपेक्षा होतीच. दिएगो गॉडिनने पहिल्या सत्रात गोल करून पहिल्यावहिल्या युरोपियन चषकासाठी उत्सुक असलेल्या अॅटलेटिको माद्रिदला आघाडी मिळवून दिली. मात्र सर्जीओ रामोसने ९३व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करून सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत खेळवण्यात आला.
अँजेल डी मारियाच्या सुरेख प्रयत्नांना यशाची किनार देत गॅरेथ बॅलेने अॅटलेटिको माद्रिदचा गोलरक्षक थिबाउट कोटरेइसला चकवून दुसरा गोल केला. अॅटलेटिको माद्रिदने सामन्यात बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण रिअल माद्रिदने प्रतिस्पध्र्यावर प्रतिहल्ले चढवत त्यांची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फळ त्यांना मार्सेलोच्या गोलच्या रूपाने मिळाले.
११८व्या मिनिटाला अॅटलेटिको माद्रिदच्या बचावपटूंना चकवून मार्सेलोने मारलेला फटका कोटरेइसच्या हाताला लागून थेट गोलजाळ्यात गेला. या गोलने रिअल माद्रिदचा विजय निश्चित झाला. पण अखेरच्या क्षणाला गोलक्षेत्रात ख्रिस्तियानो रोनाल्डोला चुकीच्या पद्धतीने पाडल्याप्रकरणी रिअल माद्रिदला पेनल्टी-किक बहाल करण्यात आली. याचा फायदा उठवत रोनाल्डोने चौथा गोल झळकावला आणि त्यानंतर स्टेडियममध्ये चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. बॉल पेसली यांच्यानंतर चॅम्पियन्स लीगचे तिसऱ्यांदा जेतेपद पटकावणारे रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी हे पहिले प्रशिक्षक ठरले आहेत.
रिअल माद्रिद क्लबमध्ये सामील झाल्यापासूनच मला याच क्षणाची प्रतीक्षा लागून राहिली होती. आता ते स्वप्न पूर्ण झाले आहे. चाहत्यांच्या दडपणामुळेच मी परिपक्व खेळाडू म्हणून घडत गेलो. आता माझ्या खात्यात दोन चॅम्पियन्स लीग सुवर्णपदकांची भर पडली आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डो, रिअल माद्रिदचा स्टार खेळाडू
रिअल चॅम्पियन्स!
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ का आहे, याची प्रचिती रिअल माद्रिद आणि अॅटलेटिको माद्रिद यांच्यातील लढतीने संपूर्ण जगाने अनुभवली.
First published on: 26-05-2014 at 02:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real madrid gets la decima with thrilling champions