यंदाच्या हंगामात रिअल माद्रिदने टॉटनहॅमच्या गॅरेथ बॅले या सर्वसाधारण खेळाडूला प्रचंड रक्कम खर्च करून आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. बॅलेला मिळालेल्या रकमेचा आकडा अचंबित करणारा होता. बॅलेसाठी खर्च करण्यात आलेल्या रकमेचा आकडा रिअल माद्रिद क्लबचे अध्यक्ष यांनी स्पष्ट केला आणि जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटूचा मान बॅलेला नव्हे रोनाल्डोकडेच असल्याचे सिद्ध झाले आहे.
गॅरेथ बॅलेला टॉटनहॅमकडून आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी रिअल माद्रिदने सुमारे ७ अब्ज, ८५ कोटी, ५१ लाख आणि २०,००० रुपये खर्च केल्याचे रिअलचे अध्यक्ष फ्लोरेनटिनो पेरेझ यांनी स्पष्ट केले. बॅले टॉटनहॅमकडून रिअल माद्रिदकडे गेला तेव्हा त्याच्यासाठी विक्रमी रक्कम खर्च करण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र ही रक्कम नक्की किती याविषयी रिअल माद्रिद किंवा टॉटनहॅम या दोन्ही क्लबनी माहिती जाहीर केली नाही. रिअल माद्रिदच्या अध्यक्षांनी बॅलेकरिताची रक्कम जाहीर केल्याने जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉलपटूचा मान ख्रिस्तियानो रोनाल्डोकडेच राहणार आहे. मँचेस्टर युनायटेडहून रिअल माद्रिदच्या संघात दाखल होण्यासाठी.. रोनाल्डोकरता सुमारे ८ अब्ज, ८ कोटी, ५० लाख रुपये एवढी रक्कम मोजण्यात आली होती. त्यामुळे श्रीमंत फुटबॉलपटूचा मान रोनाल्डोकडेच राहिला आहे.
ज्या किमतीला बॅलेला खरेदी करण्यात आले त्या सर्व रकमेचा विमा काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दुखापतग्रस्त झालेल्या या श्रीमंत खेळाडूचा विमा काढण्यात आला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पेरेझ यांनी सकारात्मक उत्तर दिले. दुखापतींना सामावून घेणारा आयुष्यभराचा विमा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, एका सामन्यात रिअलचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दुखापतग्रस्त झालेल्या बॅलेच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याच्या वृत्ताचा पेरेझ यांनी इन्कार केला. त्याला हर्नियाचा त्रास आहे. शनिवारी होणाऱ्या लढतीत तो खेळेल. हंगामापूर्वी त्याचा पुरेसा सराव झालेला नाही.पण पुढच्या लढतीत तो नक्की खेळेल, असा विश्वास पेरेझ यांनी व्यक्त केला.

Story img Loader