इतिहास आणि आकडे जरी आपल्या विरोधात असले तरी कामगिरी, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिस्पध्र्याला धक्का देण्याची कुवत ज्याच्यामध्ये असते त्याच्याच ललाटी विजयाचा भंडारा लागतो आणि असेच काहीसे घडले ते रिअल माद्रिद संघाबरोबरच्या चॅम्पियन्स लीगच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात. यापूर्वी माद्रिद आणि बायर्न म्युनिक यांच्यामध्ये २१ सामने झाले होते, त्यापैकी बायर्नने ११ जिंकले होते. त्यामुळे आकडेवारी आणि इतिहास माद्रिदच्या विरोधात असला, तरी ते डगमगले नाहीत आणि आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर बायर्नवर ४-० असा ऐतिहासिक विजय साकारत अंतिम फेरीत तब्बल १२ वर्षांनी प्रवेश केला. यापूर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीचा सामना माद्रिदने १-० असा जिंकला होता, त्यामुळे एकंदरीत ५-० अशा फरकाने माद्रिदने दोन उपांत्य फेरींमध्ये बाजी मारल्यामुळे त्यांना अंतिम फेरीचे दार सहजपणे खुले झाले.
उपांत्य फेरीचा सामना म्हणजे दोन्ही संघांवर दडपण होतेच, त्यामध्येच बार्यनच्या संघाने सामन्यात ६९.३ टक्के चेंडूवर ताबा मिळवला होता, पण त्यांचे आक्रमण माद्रिदने बेमालूमपणे थोपवले. तर दुसरीकडे फार कमी वेळा चेंडूवर ताबा मिळाला असला तरी त्याचा सुयोग्य उपयोग माद्रिदच्या संघाने केला. बार्यनने या सामन्यात १९ फटके माद्रिदच्या गोलपोस्टच्या दिशेने लगावले, पण त्यांना एकदाही यश मिळाले नाही. यापैकी त्यांचे चार फटके गोलपोस्टच्या जवळ गेलेही, पण त्यांना एकही गोल करता आला नाही. तर दुसरीकडे माद्रिदने १३ फटके बायर्नच्या गोलपोस्टच्या दिशेने लगावले, त्यातील पाच फटके गोलपोस्टवर लगावत चार गोलची कमाई केली. या सामन्यात माद्रिदच्या अफलातून रणनीतीपुढे बायर्नचा संघ निष्प्रभ ठरताना पाहायला मिळाले. अप्रतिम बचाव आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो व सर्गियो रामोस यांच्या चाणाक्ष आक्रमणाच्या जोरावर माद्रिदने या सामन्यावर आपली मोहोर उमटवली.
सामन्याच्या १६व्या मिनिटाला सर्जिओ रामोसने पहिला गोल करत संघाला गोलचे खाते उघडमून दिले. पहिल्या गोलनंतर रामोसचे मनोबल कमालीचे उंचावलेले होते, त्याचा खेळ अधिक चपळ झाला होता आणि चेंडूवरची हुकूमत आणखीनच वाढली होती. याचाच फायदा घेत रामोसने चार मिनिटांनंतर म्हणजे सामन्याच्या २०व्या मिनिटाला दुसरा गोल लगावत संघाला विजयाचा रस्ता दाखवला. रामोसने दाखवलेला विजयाचा रस्ता स्टार फुटबॉलपटू रोनाल्डोने अधिक भक्कम केला. सामन्याच्या ३४व्या मिनिटाला त्याने संघासाठी तिसरा गोल लगावला आणि मध्यंतराला माद्रिदने ३-० अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर बायर्न अधिक आक्रमक होईल असे वाटत होते, पण माद्रिदच्या अभेद्य बचावाने त्यांच्या आक्रणाची हवा काढली. दोन्ही संघांकडून आक्रमण होत असले तरी एकाही संघाकडून गोल होत नव्हता. अखेर सामन्याच्या ९०व्या मिनिटाला रोनाल्डोने चौथा गोल लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
माद्रिदने आजच्या खेळाच्या जोरावर एक अशी उंची गाठली आहे की, ज्याला विश्वामध्ये कुठेही मान्यता मिळू शकेल. उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन गोल लगावणे हे स्वप्नवत असेच होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणे हे स्वप्न होते आणि आता ते सत्यात उतरले आहे.
सर्जिओ रामोस, रिअल माद्रिदचा फुटबॉलपटू
‘‘आमच्यासाठी हा निराशाजनक दिवस आहे, ज्याचा अभ्यास आम्हाला करायला हवा. पण गेल्या दोन वर्षांमध्ये संघाने दमदार कामगिरी करत बरेच काही साध्य केले आहे. त्यामुळे फक्त या पराभवामुळे संघाला धारेवर धरू नये.’’
फिलिज लॅम, बायर्न म्युनिकचा कर्णधार