ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकच्या बळावर रिअल माद्रिदने डेपोर्टिव्हो संघाचा ८-२ असा धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह रिअल माद्रिदने ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील सर्वोत्तम विजयाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या विजयानिशी रिअल माद्रिद संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असला तरी  दुसऱ्या क्रमांकावरील अ‍ॅटलेटिको माद्रिदपेक्षा त्यांचे फक्त दोन गुण कमी आहेत.
रिअल सोसिएदाद आणि अ‍ॅटलेटिको माद्रिदकडून पराभूत झाल्यानंतर दडपणाखाली असलेल्या रिअल माद्रिदने सर्वोत्तम आक्रमक खेळ करत प्रतिस्पध्र्याना इशारा दिला आहे. अल्वारो अर्बेलोआच्या क्रॉसवर रोनाल्डोने अप्रतिम हेडरद्वारे ३६व्या मिनिटाला गोल लगावला. त्यानंतर कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिगेझने दुसरा गोल करून रिअल माद्रिदची आघाडी २-०ने वाढवली. रॉड्रिगेझचा हा ला लीगा स्पर्धेतील पहिला गोल ठरला.
त्यानंतर पुन्हा एकदा रोनाल्डोने गोल करत रिअल माद्रिदला पहिल्या सत्रात ३-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात डेपोर्टिव्होने जोमाने पुनरागमन केले. सर्जिओ रामोसच्या चुकीमुळे मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उठवत हॅरिस मेदुनान्जिन याने गोल लगावला. गॅरेथ बॅलेने लागोपाठ दोन गोल करत रिअल माद्रिदला सामन्यावर वर्चस्व मिळवून दिले. त्यानंतर काही मिनिटांनी रोनाल्डोने तिसरा गोल करत हॅट्ट्रिक साजरी केली.
 टोचे याने डेपोर्टिव्होसाठी दुसरा गोल केल्यानंतर मँचेस्टर युनायटेडकडून कर्जाऊ घेतलेल्या जेवियर हेर्नाडेझने अखेरच्या क्षणी दोन गोल करत रिअल माद्रिदला मोठा विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा