बायर्न म्युनिक आणि रिअल माद्रिद या युरोपमधील बलाढय़ संघांनी चॅम्पियन्स लीगमधील दुसऱ्या साखळी सामन्यात वर्चस्व गाजवले. बायर्न म्युनिचने इंग्लिश प्रीमिअर लीगमधील नामवंत समजल्या जाणाऱ्या मँचेस्टर सिटीचा ३-१ असा धुव्वा उडवला. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अँजेल डी मारिया यांच्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर रिअल माद्रिदने कोपनहेगम संघाचा ४-० असा दणदणीत पराभव केला.
आर्येन रॉबेनच्या सुरेख कामगिरीमुळे बायर्न म्युनिकने मँचेस्टर सिटीवर मात करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. बायर्नने आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर हा सामना जिंकला. ‘‘आम्ही सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले. चॅम्पियन्स लीग जेतेपदाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे,’’ असे बायर्न म्युनिकचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी सांगितले. बायर्न म्युनिक सहा गुणांसह ड गटात अव्वल स्थानी आहे.
रोनाल्डोने कोपनहेगनविरुद्ध दोन गोल करून आपली चॅम्पियन्स लीगमधील गोलांची संख्या पाचवर नेली आहे. सलामीच्या सामन्यात त्याने गॅलाटासारेवरील ६-१ या विजयात हॅट्ट्रिक झळकावली होती. ‘‘रोनाल्डोचे चेंडूवरील नियंत्रण आणि या सामन्यात त्याने दाखवलेले कौशल्य अप्रतिम होते. अखेरच्या मिनिटापर्यंत आम्ही गोल करण्याचे प्रयत्न केले. यावरूनच संघाची बांधिलकी दिसून येते,’’ असे रिअल माद्रिदचे प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी म्हणाले. या विजयासह माद्रिदने ब गटात सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. अन्य सामन्यांत, झ्लटान इब्राहिमोव्हिचच्या दोन गोलांमुळे पॅरिस सेंट जर्मेन संघाने बेनफिकाचा ३-० असा पाडाव केला. मँचेस्टर युनायटेडला मात्र शख्तार डोनेत्सक संघाविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करावी लागली. डॅनी वेलबॅकने १८व्या मिनिटाला गोल करून युनायटेडला आघाडी मिळवून दिली. पण टायसोन याने ७६व्या मिनिटाला बरोबरी साधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा