बेंझेमा, मॉड्रिकचा गोल; ग्रॅनडावर २-१ने विजय; गुणांच्या अर्धशतकासह तिसरे स्थान
क्रोएशियाचा मध्यरक्षक लुका मॉड्रिकने रिअल माद्रिदच्या ‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेच्या जेतेपदाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. मॉड्रिकने ८५व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलच्या जोरावर माद्रिदने २-१ अशा फरकाने यजमान ग्रॅनडाचा पराभव केला. नोव्हेंबर २०१५ नंतर प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर मिळवलेल्या या पहिल्या विजयाने प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. या विजयाबरोबर माद्रिदने गुणांचे अर्धशतक पूर्ण करून तिसरे स्थान कायम राखले आहे. अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या बार्सिलोना आणि माद्रिद यांच्यात अवघ्या चार गुणांचे अंतर राहिले आहे. ५१ गुणांसह अॅटलेटिको माद्रिद दुसऱ्या स्थानावर आहे. ३०व्या मिनिटाला करीम बेंझेमाने माद्रिदचा पहिला गोल नोंदवला होता, परंतु ६०व्या मिनिटाला युसेफ एल-अरबीने ग्रॅनडाला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना मॉड्रिकने निर्णायक गोल करून माद्रिदचा विजय निश्चित केला. ‘‘मॉड्रिकच्या या सर्वोत्तम गोलने आम्हाला जीवदान दिले आणि त्याहून अधिक संपूर्ण तीन गुण मिळवून दिले. मॉड्रिकसाठी मी आनंदी आहे आणि त्याने अजून गोल करावेत, अशी अपेक्षा आहे,’’ असे प्रशिक्षक झिनेदिन झिदान म्हणाले.