फ्रान्सचा महान खेळाडू झिनेदिन झिदानला प्रशिक्षण देण्यासाठी तीन महिन्यांची बंदी घातल्यामुळे त्याचा क्लब रिअल माद्रिदने स्पॅनिश फुटबॉल महासंघाविरुद्ध लढा देण्याचे ठरवले आहे.
१९९८मध्ये फ्रान्सला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा तसेच २०००मध्ये युरो चषक जिंकणाऱ्या फ्रान्स संघाचा सदस्य असलेला झिदान सध्या कॅस्टिलिया या रिअल माद्रिदच्या राखीव संघाला प्रशिक्षणाचे धडे देत आहे. मात्र प्रशिक्षण देण्यासाठी लागणारा कोणताही अभ्यासक्रम झिदानने केलेला नाही, असा दावा महासंघाने केला आहे. ‘‘सर्व कायदेशीर पर्याय आमच्यासाठी खुले असून आम्ही याविरोधात अपील करणार आहोत. महासंघाच्या या निर्णयाला आमची सहमती नाही. कॅस्टिलियासारख्या संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करण्यासाठी झिदानला फ्रेंच फुटबॉल महासंघाने हिरवा कंदील दाखवला आहे,’’ असे रिअल माद्रिदने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
स्पॅनिश महासंघाने कॅस्टिलिया संघाचे सहप्रशिक्षक सांतिआगो सांचेझ यांच्यावरही कारवाई केली आहे. केनाफे या स्पॅनिश प्रशिक्षण शाळेने रिअल माद्रिदविरोधात महासंघाकडे तक्रार केली दाखल केली आहे. सांचेझ यांचे नाव लावून रिअल माद्रिद नियमांचे उल्लंघन करत असल्याचे, या तक्रारीत म्हटले आहे. प्रत्येकाने प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला हवा, असा संदेश स्पेन संघाचे मुख्य प्रशिक्षक विन्सेंट डेल बॉस्के यांनी केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
रिअल माद्रिदविरोधात करण्यात आलेली कारवाई हास्यास्पद असल्याची टीका रायो व्हॅलेकानो संघाचे प्रशिक्षक पाको जेमेझ यांनी केली आहे. रिअल माद्रिदचे मुख्य प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी आणि नेदरलँड्सचे महान फुटबॉलपटू योहान क्रफ यांनी झिदानला पाठिंबा दर्शवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा