रोनाल्डो, रॉड्रिग्जचा गोल; रोमावर विजय

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जेम्स रॉड्रिग्जच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर रिअल माद्रिद क्लबने रोमा क्लबवर २-० असा विजय मिळवत युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला.

रोमा क्लबच्या एडिन झेको आणि मोहम्मद सलाह यांनी गोल करण्याची संधी गमावल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. पहिल्या सत्रात दोन्ही क्लबना गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. दुसऱ्या सत्रात रोनाल्डोने (६४ मि.) माद्रिदचे खाते उघडले. चार मिनिटांनंतर रॉड्रिग्जने माद्रिदची आघाडी दुप्पट केली. माद्रिदने २-० अशा फरकाने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

‘‘संघाचा आक्रमक खेळ पाहून आनंद झाला आणि दुसऱ्या सत्रात आम्ही बचावावर बरीच सुधारणा केली. प्रत्येकाला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकवायचे आहे आणि आम्ही त्याच प्रयत्नात आहोत,’’ असे माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदीन झिदान यांनी सांगितले.

Story img Loader