रिअल माद्रिदचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने ला लीगा स्पर्धेत सर्वाधिक वेळा हॅट्ट्रिक नोंदवण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. ला लीगामधील २३वी हॅट्ट्रिक आणि २००वा गोल करत रोनाल्डोने रिअल माद्रिदला सेल्टा व्हिगोवर ३-० असा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या विजयामुळे रिअल माद्रिदने सर्व स्पर्धामध्ये सलग १८ सामने जिंकण्याचा स्पॅनिश फुटबॉलमधील विक्रमाशी बरोबरी साधली.
टेल्मो झारा आणि रिअल माद्रिदचे महान फुटबॉलपटू अल्फ्रेडो डी स्टेफानो यांचा २२ वेळा हॅट्ट्रिक लगावण्याचा विक्रम रोनाल्डोने रविवारी मागे टाकला. त्याचबरोबर त्याने १७९ सामन्यांत २०० गोल झळकावण्याची करामत केली. कालरे अँकलोट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या रिअल माद्रिदने बार्सिलोनाने २००५-०६मध्ये रचलेल्या विक्रमाशी बरोबरी साधली असून मंगळवारी घरच्या मैदानावर होणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात सलग १९वा विजय मिळवून हा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी रिअल माद्रिदला आहे. ३६व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल झळकावल्यानंतर रोनाल्डोने ६६व्या मिनिटाला दुसऱ्या गोलाची भर घातली. ८१व्या मिनिटाला मार्सेलोच्या क्रॉसवर चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवून रोनाल्डोने हॅट्ट्रिक साजरी केली. या विजयासह रिअल माद्रिदने गुणतालिकेत ३६ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा