लाहोर : आगामी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याइतकेच भारताला हरविणे महत्त्वाचे असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
चॅम्पियन्स स्पर्धेसाठी नूतनीकरण केलेल्या लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमचे पंतप्रधान शरीफ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी बोलताना शरीफ यांनी पाकिस्तानी खेळाडूंनी भारताविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य केले.
‘‘पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. अलीकडच्या काळात त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली आहे. आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत विजेतेपदच नाही, तर दुबईत होणाऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताला हरविणे तितकेच महत्त्वाचे आहे,’’ असे शरीफ म्हणाले.
चॅम्पियन्स स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान करणार असले, तरी भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. जवळपास २९ वर्षांनी ‘आयसीसी’ची एखादी मोठी स्पर्धा भरविण्याचा मान पाकिस्तानला मिळाला आहे. ‘‘ही आमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आमचा प्रत्येक पदाधिकारी उत्साहित आहे,’’ असे शरीफ म्हणाले.