डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने रविवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर मात करून प्रथमच ‘आयपीएल’च्या विजेतेपदाला गवसणी घातली. यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर हैदराबादने बंगळुरूला नमवले. ‘आयपीएल’च्या अंतिम फेरीत खेळण्याची बंगळुरूची ही तिसरी वेळ होती. मात्र, यंदाही रॉयल चॅलेंजर्सच्या पदरी निराशाच पडली. संघात मातब्बर खेळाडूंचा भरणा असूनही या संघाला आजवर विजयाच्या दारातूनच माघारी परतावे लागले आहे. विराटच्या रॉयल चॅलेंजर्सचे आयपीएल विजयाचे स्वप्न आजवर का अधुरे आहे याची कारणे..
- मोक्याच्या क्षणी कच खाण्याची वृत्ती-
संघात अष्टपैलू आणि ट्वेन्टी-२० प्रकारातील सामन्यांसाठीचे आक्रमक खेळाडू असले तरी मोक्याच्या क्षणी कच खाण्याच्या वृत्तीनेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आजवर घात झाला आहे. संघाने आयपीएल स्पर्धेत आजवर तीन वेळा अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश मिळवला आहे. संपूर्ण स्पर्धेत बंगळुरूकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते मात्र, अंतिम सामन्यात संघाच्या लौकिकाला साजेशी कामगिरी होत नाही. महत्त्वाच्या क्षणीच बंगळुरूचे खेळाडू पुरती निराशा करतात आणि येथेच सारे गणित चुकते.
- केवळ फलंदाजीच्या जोरावर अवलंबून राहिल्याने घात-
फलंदाजी ही रॉयल चॅलेंजर्स संघाची ताकद राहिली आहे. ख्रिस गेल, विराट कोहली, डीव्हिलियर्ससारखे आक्रमक फलंदाज संघात आहेत. मात्र, गोलंदाजी तितकी प्रभावी दिसून आलेली नाही. ट्वेन्टी-२० हा झटपट क्रिकेटचा प्रकार धावा वसूल करण्याचा असला तरी गोलंदाजांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असते. गोलंदाजीच्या बळावर एकहाती सामने जिंकल्याचीही अनेक उदाहरणे आपण ट्वेन्टी-२० विश्वात पाहिली आहेत. त्यामुळे संघात अनुभवी गोलंदाजाची कमतरता असणे हे बंगळुरूच्या अपयशातील मोठे कारण म्हणता येईल.
- दबाव निर्माण करण्यात प्रतिस्पर्ध्यांना यश-
बंगळुरू संघाचे आयपीएलच्या अंतिम फेरीत आजवरचे तिनही सामने पाहिले, तर तिनही वेळेस प्रतिस्पर्धी संघाला बंगळुरू संघावर दबाव निर्माण करण्यात यश आले आहे. संघात अनुभवी आणि आक्रमक खेळाडू असूनही अखेरच्या सामन्यात खेळाताना त्यांच्या चेहऱयावर दबाव स्पष्ट दिसून येतो. २००९ साली डेक्कन चार्जर, २०११ साली चेन्नई सुपरकिंग्ज आणि यंदा हैदराबाद विरुद्धच्या लढतीवर एक नजर टाकल्यास या तिनही सामन्यात बंगळुरूचा संघ दबावाखाली खेळाताना पाहायला मिळाल्याचे दिसते.
- तिनही वेळेस धावांचा पाठलाग करण्यात अपयशी-
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स संघाने अंतिम फेरीतले आतापर्यंतचे तिनही सामने हे धावांचा पाठलाग करताना गमावले आहेत. २००९, २०११ आणि यंदा २०१६ च्या अंतिम फेरीत बंगळुरूला धावांचा पाठलाग करावा लागला. त्यातील दोन सामन्यांत संघाला दोनशेहून अधिक धावांचे लक्ष्य गाठाताना पराभवा स्विकारावा लागला. संघाची फलंदाजी मजबूत असल्यामुळे अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करायला मिळणे अपेक्षित असते मात्र, धावांचा पाठलाग करताना फलंदाजांवर दबाव निर्माण करता येतो हेच गमक प्रतिस्पर्धी संघाने हेरून बंगळुरूच्या स्वप्नांना सुरूंग लावला आहे.