गतविजेत्या बायर्न म्युनिकने सीएसकेए मॉस्को संघावर ३-१ असा विजय मिळवून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत सलग १० सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला. मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि पॅरिस सेंट जर्मेन या बलाढय़ संघांनी चॅम्पियन्स लीगच्या अव्वल १६ संघांमध्ये मजल मारली आहे.
चेल्सी, बायर्न म्युनिक, अॅटलेटिको माद्रिद, बार्सिलोना आणि मँचेस्टर सिटी यांनी याआधीच उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवल्यामुळे अव्वल आठ संघांमध्ये झेप घेण्याकरिता या बलाढय़ संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. बायर्न म्युनिकने बार्सिलोनाने २००२मध्ये रचलेला विक्रम मोडीत काढला. आर्येन रॉबेन, मारिओ गोएट्झे आणि थॉमस म्युलर यांनी प्रत्येकी एक गोल करत बायर्न म्युनिकच्या विजयात मोलाचा हातभार लावला. सीएसकेए मॉस्को संघाकडून कैसुके होन्डा याने एकमेव गोल केला.
इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी न करता आलेल्या मँचेस्टर युनायटेडने या स्पर्धेत लेव्हरकुसेन संघाचा ५-० असा धुव्वा उडवला. मँचेस्टर युनायटेडच्या विजयात अँटोनियो व्हॅलेन्सिया, जॉनी इव्हान्स, ख्रिस स्मॉलिंग, नानी आणि इमिर स्पाहिक (स्वयंगोल) यांनी गोल करून महत्त्वाची भूमिका बजावली. ‘‘आमची ही या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहे. बाहेरच्या मैदानांवर येऊन पाच गोल झळकावणे, ही आमच्यासाठी विशेष बाब आहे,’’ असे मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक डेव्हिड मोयेस यांनी सांगितले.
रिअल माद्रिदने गालाटासारे संघाचा ४-१ असा धुव्वा उडवला. गॅरेथ बॅलेने फ्री-किकवर केलेला अप्रतिम गोल आणि त्यानंतर अल्वारो आर्बेलोआ, अँजेल डी मारिया आणि इस्को यांनी गोल लगावले. स्वीडनचा झ्लटान इब्राहिमोव्हिच याने पॅरिस सेंट जर्मेनसाठी पहिला गोल करत चॅम्पियन्स लीगमधील १००व्या सामन्यात दमदार कामगिरी केली. त्यानंतर इडिन्सन कावानी याच्या गोलमुळे पॅरिस सेंट जर्मेनने ऑलिम्पियाकोस संघावर २-१ अशी मात करत आगेकूच केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा