आयपीएलच्या 14व्या मोसमातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) आपल्या नावावर केला आहे. आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा (एमआय) 2 गडी राखून पराभव केला. सलग 9व्या मोसमात मुंबईने आपला पहिला सामना गमावला आहे. या संघाने अखेरचा पहिला सामना 2013मध्ये जिंकला होता. त्याचबरोबर बंगळुरुने आतापर्यंत चार वेळा मोसमातील सलामीचा सामना खेळला आहे आणि प्रथमच विजय मिळविला आहे.

 

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने बंगळुरूसमोर 20 षटकात 9 गडी गमावत 159 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बंगळुरू संघाने 8 गडी गमावले खरे, पण सामना खिशात टाकला. ग्लेन मॅक्सवेलने 39, विराट कोहलीने 33 आणि एबी डिव्हिलियर्सने 48 धावा करत संघाच्या विजयात योगदान दिले.
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मार्को जानसेन यांनी मुंबईकडून 2-2 विकेट्स घेतल्या. तर, बंगळुरुकडून हर्षल पटेलने 5 बळी मिळवत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

रोहितची सामन्यानंतर प्रतिक्रिया

सामना गमावल्यानंतर रोहित म्हणाला, ”पहिल्या सामन्यापेक्षा ट्रॉफी जिंकणे महत्वाचे आहे.  आम्ही शेवटपर्यंत मेहनत घेतली. आम्हाला 20 धावा कमी पडल्या. आम्ही या सामन्यात नंतर खूपच समाधानकारक कामगिरी केली. बुमराह ट्रेंटची षटके लवकर संपवणे चुकीचे ठरले. या खेळपट्टीवर नीट चेंडू येत नव्हता. यापुढे खेळताना खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळावे लागेल.”

2018नंतर प्रथमच मॅक्सवेलचा लीगमध्ये षटकार

बंगळुरू संघाच्या ग्लेन मॅक्सवेलने 2018च्या हंगामानंतर प्रथमच आयपीएलमध्ये मोठी कामगिरी केली. 2019मध्ये तो आयपीएल खेळला नाही. 2020मध्ये मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला. त्यावेळी त्याने 13 सामन्यांत 15.42 च्या सरासरीने फक्त 108 धावा केल्या होत्या. यात तो एकही षटकारही मारू शकला नव्हता. यावेळी आरसीबीने 15.50 कोटी रुपयांमध्ये लिलावात मॅक्सवेलला संघात घेतले. मुंबईविरुद्धच्या सामन्यात षटकार खेचत त्याने आपला दुष्काळ संपवला.

Story img Loader