रविवार विशेष
महान खेळाडूंच्या शब्दकोषात ‘समाधान’ हा शब्द सापडणे मुश्कील असते. फक्त एकदोन विजेतेपदांवर त्यांचे मुळीच समाधान होत नाही. अधिकाधिक जेतेपदांवर आपले निर्विवाद वर्चस्व प्राप्त करण्यासाठी ते उत्सुक असतात. फ्रेंच ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आठ वेळा जिंकूनही आपण असमाधानी असल्याचे रॅफेल नदालने नुकतेच म्हटले होते. ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या विजेतेपदाचा सम्राट रॉजर फेडरर याचा १७ अजिंक्यपदाचा विक्रम त्याला साद घालतो आहे.
पॅरिसमधील रोलँड गॅरोस येथील लाल मातीच्या कोर्ट्सने अनेक भल्या-भल्या खेळाडूंनाही अव्वल यशापासून वंचित केले आहे. पीट सॅम्प्रास व स्टीफन एडबर्ग यांच्यासारख्या खेळाडूंनी अन्य ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये पराक्रम गाजवला. सॅम्प्रासने विम्बल्डन स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविले, मात्र फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्याला स्थान मिळविता आलेले नाही. मात्र अन्य स्पर्धामध्येही अव्वल यश मिळविणाऱ्या नदालने या स्पर्धेत २००५ ते २००८ व पुन्हा २०१० ते २०१३ या कालावधीत अजिंक्यपद मिळविले. २००९मध्ये त्याला दुखापतीमुळे अपेक्षेइतके अव्वल दर्जाचे यश मिळविता आले नव्हते. लाल मातीवर सव्‍‌र्हिसनंतर चेंडू खूप वेगाने येत नाही. त्यामुळे परतीचे फटके मारताना हमखास गुण मिळविण्यासाठी अतिशय अव्वल दर्जाचे कौशल्य आवश्यक असते. नदालकडे ही हुकमत नक्कीच आहे. त्याच्या जोरावरच त्याने फ्रेंच स्पर्धेवर आपल्या अतुलनीय शैलीचा ठसा उमटविला आहे.
नदाल याने ही शैली विकसित करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. लहानपणी तो टेनिस व फुटबॉल हे दोन्ही खेळ खेळत असे. त्याच्या दोन काकांपैकी मिग्वेल हे निष्णात फुटबॉलपटू होते. ते रिअल माद्रिद संघाकडून खेळत असायचे. दुसरे काका टोनी हे उत्तम टेनिसपटू होते. दोन खेळांपैकी एक खेळ निवडण्याचा सल्ला रॅफेलला वडिलांनी दिल्यानंतर त्याने टेनिसमध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. अर्थात फुटबॉलवरील त्याचे प्रेम अद्यापही कमी झालेले नाही. काका टोनी यांच्याकडून टेनिसचे बाळकडू घेतल्यानंतर त्यांच्याच सल्ल्यानुसार रॅफेलने बार्सिलोना येथे पुढचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्याने व्यावसायिक टेनिस क्षेत्रात शिरकाव केला. १७व्या वर्षी त्याने रॉजर फेडररवर सनसनाटी विजय नोंदवीत टेनिसपंडितांना आश्चर्याचा धक्का दिला. तेथूनच नदालच्या नावाला वलय प्राप्त झाले. आक्रमक फटकेबाजी, बेसलाइनवरून सफाईदार फटके, जमिनीलगत टॉपस्पीन फटके याबरोबरच चित्त्याच्या चपळाईसारखे पदलालित्य, जबरदस्त बचावात्मक खेळ, ड्रॉपशॉट्स अशी चतुरस्र शैली नदालला लाभली आहे. त्याचबरोबरच रॅकेट पकडण्याची त्याची शैलीही अनोखी मानली जाते. तो जरी डावखुरा खेळाडू असला तरी दोन्ही हाताने बॅकहँड फटके मारण्यातही तो अतिशय वाकबगार मानला जातो. केवळ लाल मातीच्या कोर्टवर नव्हे तर अन्य प्रकारच्याही कोर्ट्सवरही त्याने अव्वल यश मिळविले आहे. विम्बल्डनमध्ये दोन वेळा, ऑस्ट्रेलियन व अमेरिकन स्पर्धेत प्रत्येकी एकदा त्याने विजेतेपद मिळविले आहे. हार्ड कोर्टवर त्याने पाच वेळा मास्टर्स स्पर्धा जिंकली आहे. त्याची शैली अनेक वेळा दुखापत ओढवून घेते असे टीकाकार सांगतात आणि नदाल यालाही हे मान्य आहे. त्यामुळेच तो हार्ड कोर्टवरील एटीपी स्पर्धा कमी खेळतो. २४ वेळा एटीपी मास्टर्स व १४ वेळा एटीपी जागतिक स्पर्धामध्ये त्याने विजेतेपद मिळविले आहे.
वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षाही त्याने देशनिष्ठा ही महत्त्वाची मानली आहे. अव्वल दर्जाचे अनेक खेळाडू ऑलिम्पिक व डेव्हिस चषक स्पर्धाना फारसे प्राधान्य देत नाही. नदालने स्पेनचा नावलौकिकही जपला आहे. २००४, २००८, २००९ व २०११मध्ये त्याने आपल्या देशाला डेव्हिस चषक मिळवून दिला आहे. लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने देशाला टेनिसचे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
टेनिसमध्ये आजपर्यंत त्याने भरघोस कमाई केली आहे. आपल्या यशात लोकांनी दिलेल्या प्रोत्साहनाचा मोठा वाटा आहे असे तो मानतो आणि त्यामुळेच की काय गरीब व उपेक्षित लोकांच्या मदतीसाठी, शालेय मुला-मुलींच्या शैक्षणिक कारकीर्दीसाठी त्याने विश्वस्त संस्था स्थापन केली आहे. अनेक सामाजिक संस्थांना दरवर्षी तो भरपूर अर्थसाहाय्य करीत असतो. टेनिसमधून निवृत्त झाल्यानंतर आपल्या संस्थेमार्फत गोरगरिबांसाठी वाहून घेण्याचा त्याने निश्चय केला आहे. खरोखरीच नदाल हा मुलखावेगळा टेनिसपटू आहे.