भारतीय वन-डे आणि टी-२० संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासाठी २०१९ हे वर्ष चांगलं गेलं आहे. फलंदाजीत रोहितने या वर्षात खोऱ्याने धावा ओढल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यातही रोहितने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. यादरम्यान त्याने अनेक विक्रमही मोडले, मात्र असं असूनही त्याच्या मनात एक खंत अजुनही कायम आहे.
अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, तो ही अवघ्या ९ धावांत
विंडीजविरुद्ध मालिकेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या रोहितला मालिकावीराता किताब देण्यात आला. यावेळी बोलत असताना रोहितने आपली खंत बोलून दाखवली. “हे वर्ष ज्यापद्धतीने गेलं त्यासाठी मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. विश्वचषकात यशस्वी झालो असतो तर अधिक चांगलं झालं असतं, ती खंत माझ्या मनात कायम राहिल. मात्र संघाचा या वर्षातला खेळ आश्वासक झाला आहे. कसोटी क्रिकेट असो किंवा मर्यादीत षटकांचं क्रिकेट टीम इंडियाने हे वर्ष गाजवलं आहे.” रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या.
अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माचा डबल धमाका, कर्णधार विराटसह माजी प्रशिक्षकांनाही टाकलं मागे
२०१९ सालात रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचा रोहितने पुरेपूर फायदा करुन घेतला. “मला फलंदाजी करताना मजा आली. मात्र मला इथेच थांबायचं नाहीये, पुढच्या वर्षीही असाच खेळ करायचा आहे. मला माझा खेळ आणि माझ्या मर्यादा माहिती आहेत. त्यामुळे मी रणनिती आखून खेळतो. संघाला माझ्याकडून काय हवंय ही बाब माझ्यासाठी अधिक महत्वाची आहे, रोहित आपल्या खेळाबद्दल बोलत होता.
२०२० वर्षात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. मात्र रोहितने या मालिकेत विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे. खुद्द रोहितनेच बीसीसीआयकडे याबद्दलची मागणी केल्याचं समजतंय. यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून रोहित संघात पुनरागमन करेल. त्यामुळे २०१९ वर्ष गाजवणारा रोहित शर्मा आगामी वर्षात कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – IND vs WI : …आणि केवळ १० धावांनी रोहितचा अनोखा विक्रम हुकला