Rehmat Shah vs Hasan Mahmood Argument Video Viral: आशिया चषक स्पर्धेत रविवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आले. सामन्यादरम्यान बांगलादेशचा गोलंदाज हसन महमूद आणि अफगाणिस्तानचा फलंदाज रहमत शाह यांच्यात जोरदार वादावादी झाली. या सामन्यादरम्यान हसन महमूदने एक कृती केली, ज्यामुळे रहमत शाह त्याच्यावर चांगलाच संतापला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रहमत शाह आणि इब्राहिम झद्रान यांच्यात भागीदारी –
या सामन्यात बांगलादेशच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ३३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात त्यांचा स्फोटक फलंदाज रहमानउल्ला गुरबाजची विकेट गमावली. यानंतर इब्राहिम झद्रान आणि रहमत शाह यांनी डावाची धुरा सांभाळली.
महमूदच्या हरकतीवर संतापला रहमत शाह –
अफगाणिस्तानच्या फलंदाजीदरम्यान २३ वर्षीय हसन महमूद सातवे षटक टाकण्यासाठी आला. स्ट्राइकवर असलेल्या रहमत शाहने ड्रायव्ह लगावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा प्रयत्न चुकला. त्यानंतर चेंडू हसनच्या हातात गेला, ते पाहून शाह क्रीजच्या आत गेला. असे असतानाही हसनने चेंडू उचलला आणि शाहच्या दिशेने जोराच फेकला. हा चेंडू थेट शहाच्या डोक्यात लागणार होतो, पण त्याने तो हुकवला. त्यानंतर रेहमत शाह महमूदच्या या हरकतीवर चांगलाच संतापला.
रहमत शाहने व्यक्त केली नाराजी –
महमूद परतायला लागल्यावर शाहने त्याला मागून अनेक गोष्टी सांगितल्या. तो चिडला होता. तस्किन अहमद महमुदपर्यंत पोहोचला आणि दोघेही हसताना दिसले. यामुळे शाहचा राग आणखी वाढला आणि तो पंचांशी बोलू लागला. पंचांनी त्याला शांत केले आणि मग सामना सुरू झाला. शाहला तस्किन अहमदने बोल्ड केले. संपूर्ण संघ मिळून केवळ २४५ धावा करू शकला आणि बांगलादेशने ८९ धावांनी सामना जिंकला.