स्पर्धा स्थगित करण्याचा ‘बीसीसीआय’चा निर्णय; साहा, मिश्रा यांना करोनाची बाधा

नवी दिल्ली : जैव-सुरक्षित वातावरणाचे चक्रव्यूह भेदून करोनाने प्रवेश केल्याने आता क्रिकेटपटूंनाही या संसर्गाची बाधा होऊ लागली आहे. मंगळवारी आणखी दोन क्रिकेटपटूंना करोनाची लागण झाल्याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा मध्यातच अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करावी लागली आहे.

सनरायजर्सचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमन साहा तसेच दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा या दोन खेळाडूंचे करोना अहवाल मंगळवारी सकारात्मक आल्यानंतर ‘आयपीएल’च्या स्थगितीचा निर्णय ‘बीसीसीआय’ला घ्यावा लागला. ‘‘अनिश्चित कालावधीसाठी आम्ही स्पर्धा स्थगित करत आहोत. या महिन्यात ही स्पर्धा घेणे अशक्य आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून स्थान मिळवत ही स्पर्धा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. कदाचित सप्टेंबरमध्ये विश्वचषकापूर्वी ही स्पर्धा घेणे शक्य होईल. पण तूर्तास तरी आम्ही थांबत आहोत,’’ असे ‘आयपीएल’चे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल म्हणाले.

‘‘सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. उर्वरित स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता या वर्षांत ही स्पर्धा घेण्यासाठी एक महिन्याचा कालावधी कधी मिळेल, याची चाचपणी करत आहोत. कदाचित सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा विचार असला तरी सद्य:स्थितीत या सर्व शक्यता आहेत,’’ असे ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.

सोमवारी चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी तसेच कोलकाता नाइट रायडर्सचे गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना करोनाची लागण झाली होती. तसेच नवी दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवरील पाच मैदान कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यामुळे सलग दोन दिवस ‘आयपीएल’चे सामने पुढे ढकलावे लागले होते.

‘‘खेळाडू तसेच संबंधितांचे आरोग्य आणि सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य राहील. आयपीएल प्रशासकीय मंडळ तसेच बीसीसीआयने तातडीची बैठक घेऊन आयपीएलचे १४वे पर्व अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. खेळाडू, प्रशिक्षक, संबंधित अधिकारी आणि भागधारकांचे आरोग्य तसेच सुरक्षितता लक्षात घेता ही स्पर्धा आम्ही पुढे ढकलत आहोत. आता इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अन्य देशांतील क्रिकेटपटूंना त्यांच्या मायभूमीत परत पाठवण्याची आमची जबाबदारी आहे. भारतात सध्या करोनाची गंभीर परिस्थिती असली तरी प्रत्येकाला आपल्या देशात पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू,’’ असे ‘आयपीएल’च्या पत्रकात म्हटले आहे.

बीसीसीआयचे २००० कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : ‘आयपीएल’ अर्धवट स्थितीतच स्थगित करावी लागल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) जवळपास २ हजारपेक्षा जास्त कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. ‘‘१४वा हंगाम स्थगित करावा लागल्याने आम्हाला २००० ते २५०० कोटी रुपये गमवावे लागणार आहेत. हा आकडा २२०० कोटींपर्यंत जाऊ शकतो,’’ असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. ५२ दिवस ६० सामन्यांची ही स्पर्धा मध्येच थांबवावी लागली. त्यामुळे २४ दिवसांतील २९ सामन्यांचा खेळ होऊ शकला नाही. प्रक्षेपण हक्काद्वारे स्टार स्पोर्ट्सकडून मिळणारा मोठा हिस्सा बीसीसीआयला गमवावा लागणार आहे. स्टारने पाच वर्षांसाठी १६३४७ कोटी रुपयांचा (दरवर्षी ३२६९ कोटी) करार केला आहे. त्याद्वारे प्रत्येक सामन्याला ५४.५ कोटी रुपये मिळणार असतील, तर २९ सामन्यांचे मिळून १५८० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तसेच मुख्य पुरस्कर्ता म्हणून विवोकडून दरवर्षांला ४४० कोटी रुपये मिळणार आहेत. आता बीसीसीआयला निम्म्या रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे. त्याचबरोबर अनअ‍ॅकॅडमी, ड्रीम११, सीरेड, अपस्टॉक्स आणि टाटा मोटर्स यांच्याकडून मिळणाऱ्या १२० कोटी रुपयांवरही पाणी सोडावे लागणार आहे.

Story img Loader