मेलबर्न कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने भारतीय संघाच्या आनंदात मीठ टाकण्याचं ठरवलेलं दिसतंय. ऑस्ट्रेलियाच्या पराभवाला खेळपट्टी आणि क्युरेटरला दोष दिल्यानंतर पेनने भारतीय संघाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट हे तिन्ही खेळाडू सध्या संघाबाहेर असल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीत सातत्य येत नसल्याचं कर्णधार टीम पेनने म्हटलं आहे.
अवश्य वाचा – IND vs AUS : टीम पेनचं रडगाणं सुरुच, म्हणतो भारताला सोयीची खेळपट्टी बनवल्याने आम्ही हरलो !
दबाव, कसोटी क्रिकेटचा कमी अनुभव आणि भारतातल्या सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करावा लागत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडलाय. मात्र प्रतिस्पर्धी संघातील दोन-तीन महत्वाच्या खेळाडूंना तुम्ही बाहेर केलंत, तर त्यांचीही परिस्थिती बिकट होईल. पेन सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होता. “जर भारतीय संघातून तुम्ही विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना बाहेर काढलतं, तर त्यांची परिस्थितीही बिकट झाली असती. सध्याच्या संघात काही खेळाडूंना कसोटी क्रिकेटचा मोठा अनुभव नाही, त्यामुळे संघाच्या कामगिरीत सातत्य नाही. त्यामुळे आमचे सर्वोत्तम फलंदाज संघात परत आले की दोन्ही संघांमध्ये खऱ्या अर्थाने लढत होईल.” टीम पेनने मेलबर्नमधील पराभावंनतर आपली बाजू मांडली.
अवश्य वाचा – IND vs AUS : जरा विराटकडून शिका, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी फलंदाजांना सुनावलं