औरंगाबाद शहरातील क्रिकेटपटूंना आता रणजी करंडक दर्जाच्या मैदानावर सराव करता येणार आहे. महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या गरवारे मैदानाचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अतुल सावे यांच्या हस्ते या मैदानाचा लोकार्पण करण्यात आलं. क्रिकेटचं बदलेलं रुप पाहता आंतराष्ट्रीय दर्जाच्या मैदानाप्रमाणे या मैदानाचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. १९९७ साली महानगरपालिकेच्या जागेवर गरवारे समूहाकडून हे स्टेडियम उभारण्यात आलं होतं. त्याप्रसंगी तत्कालीन खासदार मोरेश्वर सावे आणि आमदार चंद्रकात खैरे यांनी या मैदानासाठी पाठपुरावा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मैदानाचं नुतनीकरण करताना खेळाडूंना अत्याधुनिक सोयी-सुवीधा मिळतील याची काळजी घेण्यात आलेली आहे. नवी दिल्लीतील नेहरु मैदानाच्या पार्श्वभुमीवर गरवारे मैदानाची खेळपट्टी तयार करण्यात आलेली आहे. ५ एकर मैदानाच्या जागेवर एकूण ११ धावपट्ट्या तयार करण्यात आल्या असून प्रत्येक धावपट्टीच्या शेजारी सरावासाठी वेगळी जागा सोडण्यात आलेली आहे. याचसोबत अंडरग्राऊंट स्पिंक्लर सिस्टीम, बर्मुडा ग्रास यासारख्या आधुनिक सोयी-सुवीधा मैदानावर तयार करण्यात आलेल्या आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या पुढाकारातून गरवारे स्टेडियमच्या नूतनिकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी एक कोटी ३२ लाख खर्च करण्यात आले. मुंबई येथील अर्चना सर्व्हिसेस या कंपनीकडून मैदानाचं काम करण्यात आलं आहे. मैदानाच्या नुतनीकरणानंतर पोलिस विरुद्ध महानरपालिका संघात प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovation work of garware ground in aurangabad city completed players will get advance facilities in ground