आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नियुक्त केलेली शिस्तपालन समिती या महिनाअखेपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे.
त्रिसदस्य समितीने गेल्या दोन दिवसांत बीसीसीआयचे कायदेशीर सल्लागार तसेच मोदी यांच्यातर्फे कायदेशीर बाजू मांडणाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. या समितीने २९ एप्रिल रोजी पुन्हा या दोघांची बाजू ऐकून घेण्याचे ठरविले आहे. मोदी यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्यामुळे ते सध्या लंडन येथे राहात आहेत. त्यांच्या कायदेशीर सल्लागाराने उलटतपासणी व आणखी काही पुरावे देण्यासाठी आणखी थोडा अवधी मागितला आहे. त्यांचे वकील मेहमूद अब्दी यांनी सांगितले, जवळ जवळ २५ हजार पानांचा हा अहवाल असल्यामुळे आम्हाला त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणखी थोडा अवधी लागणार आहे. आमच्या अशिलांना जी कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचे आम्ही पाठविलेले उत्तर या समितीने विलंब झाला या कारणास्तव अमान्य केले आहे. आम्ही आमची बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला मात्र आम्हास काहीही दाद दिली जात नाही.
त्रिसदस्य समितीत अरुण जेटली, ज्योतिरादित्य शिंदे, चिरायू अमीन यांचा समावेश आहे. आयपीएल स्पर्धेबाबत आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप करीत मोदी यांना जुलै २०१०मध्ये आयपीएल प्रमुख पदावरून डच्चू देण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report on lalit modi in this month