भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची पंजाब पोलिसांच्या डीएसपी पदावरुन हकालपट्टी करण्यात आलेली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. २०१७ साली पार पडलेल्या महिला विश्वचषकात भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती, मात्र इंग्लंडच्या संघाने भारताला अंतिम फेरीत पराभूत करत विजेतेपदावर नाव कोरलं होतं. हरमनप्रीत कौरने या स्पर्धेत केलेली कामगिरी पाहता, पंजाब सरकारने हरमनप्रीतची डीएसपी पदावर नियुक्ती केली होती. मात्र पंजाब पोलिसांनी केलेल्या पडताळणीमध्ये हरमनप्रीतची डिग्री बनावट असल्याचं समोर आलं होतं.
पंजाब पोलिसांमध्ये दाखल होण्याआधी हरमनप्रीत कौरने पश्चिम रेल्वेची नोकरी सोडली होती. हरमनप्रीतने २०११ साली चौधरी चरणसिंह विद्यापीठातून आपली ग्रॅज्युएशन झाल्याची डिग्री दाखवली होती. मात्र पडताळणीदरम्यान हरमनप्रीतच्या डिग्री प्रमाणपत्रावरचा पटक्रमांक विद्यापीठाच्या नोंदीप्रमाणे जुळत नव्हता.
या प्रकरणानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने हरमनप्रीतकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. हरमनप्रीतच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार तिला पंजाब पोलिसांमध्ये कॉन्स्टेबल पदाची नोकरी मिळू शकते. या घटनेनंतर पंजाब पोलिस हरमनप्रीत कौरविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत असून, तिला मिळणाऱ्या सरकारी सोयी-सुविधांवरही पाणी सोडावं लागण्याची शक्यता आहे.