आयपीएल २०२१ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) अंतिम फेरीत पोहोचला असून क्वालिफायर दोनच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) हे संघ आमनेसामने येतील. जे संघ बाहेर गेले आहेत, त्यांनी आता आयपीएल २०२२ ची तयारी सुरू केली आहे. पुढील हंगामासाठी मोठा लिलाव होईल. तत्पूर्वी पंजाब किंग्जचा कप्तान केएल राहुलबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राहुल या फ्रेंचायझीपासून वेगळा होणार असल्याचे वृत्त आहे. लिलावात त्याच्यावर जोरदार बोली लागण्याची शक्यता आहे.

२०१८ पासून राहुल पंजाब किंग्जसाठी चांगली कामगिरी करत आहे. मात्र, या काळात त्याला संघाचे जेतेपद मिळवता आले नाही. त्याने पंजाबकडून खेळलेल्या ४ पैकी ३ हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा केल्या. तो केवळ २०१९ मध्ये हा टप्पा पार करू शकला नाही. त्याने त्या मोसमात ५९३ धावा केल्या.

फ्रेंचायझी राहुलच्या संपर्कात

फलंदाजीतील सातत्य पाहता फ्रेंचायझीने राहुलला २०२० च्या हंगामापूर्वी कर्णधार बनवले. क्रिकबझच्या बातमीनुसार, पुढच्या वर्षी बहुधा राहुल पंजाब किंग्जकडून खेळणार नाही आणि मेगा लिलावात त्याचा समावेश होण्याची शक्यता आहे. बातमीनुसार, अनेक फ्रेंचायझींनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे, जर राहुल पंजाबपासून वेगळा झाला, तर त्याला लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IPL 2021 : हे घृणास्पदच..! RCB स्पर्धेबाहेर पडल्यानंतर मॅक्सवेल भडकला; ट्विटरवरून व्यक्त केला संताप!

दरम्यान, राहुलने टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या बायो बबलमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब आयपीएल २०२१ च्या गटफेरीतून बाद झाला. रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२२ साठी लिलाव टी-२० वर्ल्ड कपदरम्यान आयोजित केला जाऊ शकतो. आयपीएलच्या पुढील हंगामात, दोन नवीन संघ येणार आहेत. अशा परिस्थितीत दोन्ही नव्या संघांची नजरही केएल राहुलवर असेल.

Story img Loader