वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिकेआधी महेंद्रसिंह धोनी झारखंडकडून विजय हजारे चषकात खेळण्याची शक्यता आहे. आशिया चषकात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर आगामी मालिकेसाठी धोनी सरावाच्या दृष्टीकोनातून विजय हजारे चषकात खेळू शकतो. असं घडल्यास 2017 सालानंतर धोनी पहिल्यांदा या स्पर्धेत खेळेल. मुंबई मिरर या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अवश्य वाचा –  विश्वचषकासाठी बीसीसीआयची खबरदारी; महत्वाच्या खेळाडूंना सक्तीची विश्रांती मिळणार

झारखंड सध्या क गटात पहिल्या स्थानावर आहे. 11 ऑक्टोबर रोजी झारखंड सेनादलाविरुद्ध आपला अखेरचा साखळी सामना खेळेल. यानंतर 14 ऑक्टोबरपासून स्पर्धेची बाद फेरी सुरु होणार आहे. आशिया चषकानंतर धोनी झारखंडकडून साखळी सामन्यात खेळणार होता, मात्र त्याला खेळता आलं नाही. मुंबई मिररच्या वृत्तानुसार बाद फेरीच्या सामन्यांमध्ये धोनी झारखंडकडून खेळण्याची शक्यता आहे.

अवश्य वाचा – वन-डे, टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा, ख्रिस गेलचा संघात समावेश नाही

“यंदाच्या हंगामात धोनी झारखंडकडून खेळला नसला तरीही सप्टेंबर महिन्यापासून तो संघासोबत सराव करतोय. संघाचा मार्गदर्शक म्हणून प्रत्येक वेळी तो खेळाडूंशी संवाद साधायला हजर असतो. त्यामुळे तो प्रत्यक्ष सामन्यात खेळेल की नाही याला फारसं महत्व नाहीये.” झारखंड क्रिकेट असोसिएशनचे सचिन देबाशिश चक्रवर्ती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना संघटनेची बाजू मांडली. यंदाच्या हंगामात धोनीची बॅट म्हणावी तशी तळपलेली नाही, त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी धोनीला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे धोनी आता विजय हजारे चषकात खेळतो की नाही याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – पृथ्वीने फलंदाजीचे तंत्र अधिक विकसित करावे!