मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. अर्जुनने आतापर्यंत चार सामन्यात तीन बळी घेतले असून फलंदाजी करताना त्याला केवळ १३ धावा करता आल्या. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात अर्जुनला फलंदाजीची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ९ चेंडूत १३ धावा केल्या. यामध्ये एका षटकाराचाही समावेश आहे. आतापर्यंत अर्जुनला फक्त एकाच सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यानंतर आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाला आवाहन केलं आहे की, “अर्जुनला फलंदाजीसाठी जास्तीत जास्त संधी द्यावी.”
युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी CINE PUNJABI यूट्यूब चॅनलवर अर्जुनच्या फलंदाजीवर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी मुंबई संघ व्यवस्थापनाला आवाहनही केलं आहे. योगराज सिंग म्हणाले, “मी मुंबई इंडियन्स संघाच्या व्यवस्थापनाला हात जोडून विनंती करतो की, त्यांनी अर्जुनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी द्यावी. कारण अर्जुन तेंडुलकर चंदीगडला आला होता, तो माझ्याकडे १२ दिवस राहिला. तो फलंदाजी कशी करतो? हे तुम्हालाही कळायला हवं. माझ्या विद्यार्थ्यांमध्ये काय खासियत आहे? हे कोचला कळायला हवं. ज्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याला पुढे आणलं पाहिजे.”
योगराज सिंग पुढे म्हणाले, ‘मी पुन्हा सांगतो की, ज्यादिवशी अर्जुन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल किंवा टी-२० मध्ये सलामीला येईल, तेव्हा तो असा फलंदाज बनेल की जगाला कायमस्वरुपी लक्षात राहील, हे मी तुम्हाला लिहून देतो. तो एक चांगला फलंदाज आणि गोलंदाज आहे. त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली पाहिजे, असं मला वाटतं.”
हेही वाचा- महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी बजरंग पुनियाचा गंभीर आरोप, म्हणाला, “आता ट्वीट…”
खरं तर, रणजी ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात अर्जुनने फलंदाजी करताना शतकही ठोकलं होतं. त्याआधी अर्जुन चंदीगडला गेला होता, जिथे त्याने योगराज सिंग यांच्याकडून काही दिवस प्रशिक्षणही घेतलं आहे.