ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला वगळण्याच्या निर्णयाचा निषेध करीत आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाचे (फिला) अध्यक्ष रॅफेल मार्टिनेटी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. फुकेत येथे फिलाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी राजीनामा सादर केला अशी माहिती फिलाचे सदस्य नेनाद लॅकोव्हिक यांनी येथे दिली. मार्टिनेटी हे २००२ पासून फिलाचे अध्यक्षपद भूषवित होते. अमेरिकन कुस्तीचे कार्यकारी संचालक रिच बेंडर यांनी मार्टिनेटी यांच्या कारकिर्दीबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले, मात्र त्यांचा हा राजीनामा कुस्तीसाठी प्रेरणादायक होईल असे सांगितले. ते पुढे म्हणाले, बदलत्या काळानुसार काही निर्णय घेणे आवश्यक होते, मात्र असे निर्णय घेण्यात व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर दबाव निर्माण करण्यात मार्टिनेटी कमी पडले. आता नवीन अध्यक्ष निश्चित कुस्तीस ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यासाठी काही ठोस पावले उचलतील तसेच नवीन पदाधिकारी आयओसीबरोबर चांगले संबंध ठेवतील अशी आशा आहे.