उरुग्वेच्या दिएगो फोर्लानची हुकलेली पेनल्टी.. पहिल्या सत्रात ब्राझीलने घेतलेली आघाडी.. त्यानंतर लगेचच उरुग्वेने साधलेली बरोबरी.. निर्णायक आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी केलेले प्रतिहल्ले.. सामना रंगतदार स्थितीत असताना उंचपुऱ्या पॉलिन्होने हेडरद्वारे केलेला विजयी गोल.. यामुळे ब्राझीलने कॉन्फेडरेशन चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता ब्राझीलला कॉन्फेडरेशन चषक उंचावण्यासाठी रविवारी विश्वविजेत्या स्पेन आणि इटली यांच्यातील विजेत्याशी झुंज द्यावी लागणार आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच ब्राझीलच्या डेव्हिड लुइझने आपल्याच गोलक्षेत्रात दिएगो लुगानोला पाडल्यानंतर उरुग्वेला पेनल्टी-किक बहाल करण्यात आली. पण दिएगो फोर्लानला त्याचा फायदा उठवता आला नाही. फोर्लानने मारलेला फटका ब्राझीलचा गोलरक्षक ज्युलियो सेसारने डाव्या बाजूला झेप घेऊन अडवला. स्टेडियममधील वातावरण तापल्यानंतर ब्राझीलने जोरदार चाली रचल्या. अखेर पहिल्या सत्राची दोन मिनिटे शिल्लक असताना फ्रेड याने ब्राझीलचे खाते खोलले. पॉलिन्होकडून मिळालेल्या पासवर नेयमारने चेंडूवर नियंत्रण मिळवले. उरुग्वेचा गोलरक्षक फर्नाडो मुस्लेरा याने नेयमारचा फटका अडवण्याचा प्रयत्न केला. पण समोरच उभ्या असलेल्या फ्रेडने चेंडू सहजपणे गोलजाळ्यात ढकलला.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच उरुग्वेने चोख प्रत्युत्तर दिले. ब्राझीलच्या बचावपटूंकडून लुइस सुआरेझने चेंडू हिरावून घेतल्यानंतर त्याने तो एडिन्सन कावानीकडे सोपवला. कावानीने कोणतीही चूक न करता उरुग्वेला बरोबरी साधून दिली. सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटणार, असे वाटत असतानाच नेयमारच्या क्रॉसवर पॉलिन्होने हवेत उंच उडी घेऊन हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली आणि स्टेडियममध्ये ब्राझीलच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. निर्णायक गोल झळकावल्यानंतर पॉलिन्होने स्टेडियमबाहेर जाऊन सहकाऱ्यांसोबत विजयाचा आनंद साजरा केला. आता घरच्या चाहत्यांना कॉन्फेडरेशन चषक विजयाची भेट देण्यासाठी ब्राझील उत्सुक आहे.
उरुग्वेवर विजय मिळवून ब्राझील अंतिम फेरीत
उरुग्वेच्या दिएगो फोर्लानची हुकलेली पेनल्टी, पहिल्या सत्रात ब्राझीलने घेतलेली आघाडी, त्यानंतर लगेचच उरुग्वेने साधलेली बरोबरी, निर्णायक आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी केलेले प्रतिहल्ले सामना रंगतदार स्थितीत असताना उंचपुऱ्या पॉलिन्होने हेडरद्वारे केलेला विजयी गोल यामुळे ब्राझीलने कॉन्फेडरेशन चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
First published on: 27-06-2013 at 07:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resilient brazil through to confederations cup final