भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाच्या नेमणुकीवरुन आता, क्रिकेट प्रशासकीय समितीमध्ये फूट पडताना दिसत आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उप-कर्णधार स्मृती मंधाना यांनी रमेश पोवार यांनाच भारतीय संघाचा प्रशिक्षक करावं अशी विनंती केली होती. मात्र प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही मागणी फेटाळली होती. ज्यावेळी विराट कोहली प्रशिक्षक अनिल कुंबळेंशी आपलं जमत नसल्याचं सांगतो त्यावेळी त्याच्या मताचा आदर करत रवी शास्त्रींची नेमणूक केली जाते. मग हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांनी रमेश पोवार यांना प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याची मागणी केली, तर त्यांच्या मताचा आदर का होत नाही? असा सवाल क्रिकेट प्रशासकीय समितीच्या सदस्या व माजी क्रिकेटपटू डायना एडुलजी यांनी विचारला आहे. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एडुलजी बोलत होत्या.

अवश्य वाचा – ‘देव’माणूस करणार भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी प्रशासकीय समितीची नेमणूक केली होती. या ५ सदस्यांच्या समितीपैकी ३ सदस्यांनी राजीनामा दिला आहे. सध्या अध्यक्ष विनोद राय आणि डायना एडुलजी हेच सदस्य कारभार चालवत आहेत. मात्र या दोघांमध्येही अनेक मुद्द्यांवरुन संघर्ष झाल्याच्या बातम्या आतापर्यंत समोर आल्या आहेत. बीसीसीआयचे महत्वाचे निर्णय अधिकारी वर्ग फक्त विनोद राय यांना विचारून घेत असल्याचं एडुलजी यांचं म्हणणं आहे. एडुलजी यांनी रमेश पोवार यांना पुन्हा प्रशिक्षकपदी नेमण्याची मागणी केल्यानंतर विनोद राय यांनी, प्रशिक्षकाची निवड ही मतदानाने होत नसते असं उत्तर दिलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना एडुलजी यांनी विराट कोहली-अनिल कुंबळे वादाप्रकरणी कोहलीने राहुल जोहरी यांना पाठवलेल्या संदेशाचा दाखला दिला.

जर संघाची कर्णधार आणि उप-कर्णधार रमेश पोवार यांना कायम राखण्याची मागणी करत असेल तर त्याचा आदर का होत नाही? रमेश पोवार यांच्यासोबतच भारतीय महिला संघ आगामी दौरा करु शकतो. विनोद राय यांनी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीला, महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड करण्याची विनंती केली होती. मात्र या समितीने थोड्या वेळाची मागणी केली असतानाही, प्रशासकीय समितीने माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांची समिती नेमत प्रशिक्षक निवडीचे अधिकार त्यांना दिले. त्यामुळे या सर्व गोष्टी विनोद राय आपल्याला न विचारचा करत असल्याचा गंभीर आरोप एडुलजी यांनी केला. २० डिसेंबर रोजी ३ सदस्यीय समितीची इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. त्यामुळे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोणाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader