हॉकी विश्वचषकात भारत विरुद्ध बेल्जियम यांच्यातील सामना बरोबरीत सुटला तरी यजमान भारताने खरोखरच कमालीचा खेळ केला. विशेष करून भारताकडून कोठाजित सिंगकडून आलेल्या अफलातून पासवर सिमरनजित सिंगने केलेला गोल हा खास क्रिकेटमधील ‘धोनी स्पर्श’ असल्यासारखाच वाटल्याचे मत माजी ऑस्ट्रेलियन हॉकीपटू आणि जगविख्यात प्रशिक्षक रिक चार्ल्सवर्थ यांनी सांगितले.
चार्ल्सवर्थ हे तरुणपणी हॉकीबरोबरच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. त्यामुळे हॉकीइतकेच क्रिकेटवरही प्रेम असलेल्या चार्ल्सवर्थ यांनी भारताच्या त्या गोलला संकटकाळी डोके शांत ठेवून आपले काम चोख बाजवणाऱ्या धोनीच्या खेळीची उपमा दिली.
‘‘धोनी अगदी ऐन वेळी ज्याप्रमाणे महत्त्वपूर्ण खेळी खेळतो, तसाच हा गोल होता. क्रिकेटमध्ये कोणत्याही यष्टिरक्षकाला प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूच्या दिशेने हात करून चेंडू त्याच्या हातात येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. बहुतांश वेळा चेंडू त्याच्या हातात येत नाहीत; पण ज्या वेळी तो चेंडू फलंदाजाला ओलांडून यष्टिरक्षकाकडे येतो, त्या वेळी अगदी योग्य जागी यष्टिरक्षकाचा पंजा असावा लागतो. तसेच तो झेल त्याला टिपावाच लागतो.
त्याप्रमाणेच कोठाजित सिंगने त्याच्याकडे आलेल्या चेंडूने बेल्जियमच्या खेळाडूंच्या कोंडाळ्यातून बरोबर सिमरनजित सिंगकडे पास दिला. त्या वेळी सिमरनजित अगदी गोलजाळीनजीक उभा होता; पण तेवढेच पुरेसे नव्हते. त्याने त्याची हॉकी स्टीक जमिनीला अगदी लागून आणि योग्य त्या कोनात ठेवलेली होती. त्या स्टिकचा कोन थोडा जरी जमिनीपासून वर किंवा वेगळ्या दिशेने असता तर गोल होऊच शकला नसता. लांबून पाहणाऱ्यांना हा गोल सोपा वाटत असला तरी तो तितकासा सोपा नव्हता,’’ अशा शब्दांत चार्ल्सवर्थ यांनी त्या गोलचे कौतुक केले.