ENG vs AUS, Ashes 2023: अ‍ॅशेस २०२३मध्ये आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला असून त्यांच्यावर टीका होत आहे. ऑस्ट्रेलियाने एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला आणि लॉर्ड्सवर खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना ४३ धावांनी जिंकला. त्यामुळे आता तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने काही बदल करावे असे मत अनेक क्रिकेटपटू व्यक्त करत आहेत. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पाँटिंगने इंग्लंडचा महान दिग्गज खेळाडू जेम्स अँडरसनला संघातून वगळावे अशी सूचना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता या दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ले येथे ६ जुलैपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने जेम्स अँडरसनबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्याच्या मते, जेम्स अँडरसनने या मालिकेत आतापर्यंत इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केलेली नाही आणि त्याला तिसऱ्या कसोटी सामन्यातून वगळले पाहिजे.

रिकी पॉन्टिंगने आयसीसी रिव्ह्यू या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, “या मालिकेत जेम्स अँडरसन हा आतापर्यंतचा इंग्लंडचा सर्वात निराशाजनक कामगिरी करणारा गोलंदाज राहिला आहे. तुम्ही नेहमी त्याच्याकडून नवीन चेंडूने चांगली स्विंग गोलंदाजी करण्याची अपेक्षा करता. तो नवीन चेंडूवर जास्तीत जास्त विकेट घेतो. मात्र, या मालिकेत असे दिसले नाही. त्यालाही मोठ्या कष्टाने विकेट मिळत आहेत आणि तो खूप धावाही देत आहे.”

हेही वाचा: Rohit Sharma: वेस्ट इंडीजला जाताच हिटमॅनने बदलला लूक, तुम्हीच पाहा आणि ओळखा; फोटो व्हायरल

तिसर्‍या कसोटीसाठी मार्क वुडचा इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करावा: रिकी पाँटिंग

जेम्स अँडरसनने आतापर्यंत या मालिकेत दोन सामन्यांमध्ये ७५.३३च्या सरासरीने ३ विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात त्याने ट्रॅव्हिस हेडचा झेलही सोडला. रिकी पाँटिंगच्या मते, इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत जेम्स अँडरसनच्या जागी मार्क वुडचा समावेश करावा. रिकी पाँटिंग म्हणाला, “मला वाटते की जेम्स अँडरसनच्या जागी मार्क वुडचा संघात समावेश केला जाऊ शकतो. जर मार्क वुड तंदुरुस्त असेल तर त्याच्यापेक्षा चांगला पर्याय नाही आणि शिवाय इंग्लंडला शेवटचे तीन सामने जिंकायचे असतील तर मार्क वुड हाच योग्य खेळाडू असेल.”

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लीड्समध्ये ६ जुलैपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथचा हा १००वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने याबाबत मोठे वक्तव्य केले असून तिसरी कसोटी जिंकून मालिका खिशात घातली पाहिजे, असेही म्हटले आहे.

हेही वाचा: ENG vs AUS: अ‍ॅशेसमध्ये पराभवाच्या मार्गावर असलेल्या इंग्लंडसाठी वाईट बातमी, उर्वरित सामन्यांमधून उपकर्णधार बाहेर

‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’नुसार, स्टीव्ह स्मिथ म्हणाला, “मला ते अजिबात आवडले नाही. मी शांत बसून बेन स्टोक्सची खेळी पाहत होतो आणि दुसऱ्या कसोटीतही असेच काहीसे घडले. मी हेडिंग्ले येथे माझा १००वा कसोटी सामना खेळत आहे आणि हे जाणून मला खूप आनंद होत आहे. ऑस्ट्रेलियाकडून खूप कमी खेळाडूंनी ही कामगिरी केली आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ricky ponting does not want to see james anderson in england playing xi for third test avw