Ricky Ponting on Rohit Sharma’s Retirement : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने अलीकडेच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहितने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर भारत नुकताच रोहितच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकला आहे. या स्पर्धेनंतर रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल अशी चर्चा होती. मात्र रोहितने स्पष्ट केलं की त्याच्या डोक्यात सध्या निवृत्तीचा विचार नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने रोहितच्या निवृत्तीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

रिकी पॉन्टिंग म्हणाला, “२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. हा पराभव रोहित विसरू शकलेला नाही. त्यामुळेच रोहित आता पुढच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची तयारी करत आहे. भारतीय संघाच्या कर्णधाराला स्वतःला आणखी एक संधी द्यायची आहे. त्याचबरोबर रोहितची चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर तुमच्याही लक्षात येईल की सध्या तरी रोहितच्या निवृत्तीची वेळ आलेली नाही. त्याच्यात अजून बरंच क्रिकेट बाकी आहे. रोहितला २०२७ ची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. तो सध्या त्याच स्पर्धेचा विचार करतोय.”

निवृत्तीबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?

दुबईत खेळवण्यात आलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने विजेतेपद पटकावल्यानंतर रोहित शर्माने त्याच्या आगमी कारकिर्दीविषयी भाष्य केलं. हा त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना असेल असं म्हटलं जात होतं. परंतु, रोहितने या अफवांचं खंडण केलं आणि २०२७ च्या वर्ल्डकपबाबत भाष्य केलं. रोहित म्हणाला, “सध्या माझ्या दिशेने जशा गोष्टी येत आहेत, तसा मी त्या स्वीकारत आहे. खूप पुढचा विचार करणं योग्य नाही. सध्या, माझं लक्ष केवळ चांगलं खेळण्यावर आणि योग्य मानसिकता राखण्यावर आहे. मी २०२७ च्या विश्वचषकात खेळेन की नाही हे आताच सांगू शकत नाही. सध्या अशी वक्तव्ये करण्यात काही अर्थ नाही. वास्तववादी दृष्टिकोनातून, मी नेहमीच माझ्या कारकिर्दीत एक-एक पाऊल टाकले आहे,”

रोहित शर्मा म्हणाला, “मी भविष्याबाबत फार विचार करत नाही, मला मुळात याबाबत जास्त विचार करायला आवडत नाही आणि मी याआधीही असं कधी केलं नाही. सध्या तरी मी माझ्या क्रिकेटचा आणि या संघाबरोबर विजयी क्षणांचा आनंद घेत आहे. मला आशा आहे की माझ्या सहकाऱ्यांनाही माझी उपस्थिती आवडत असेल. सध्या तरी तेवढंच महत्त्वाचं आहे.”