माजी कर्णधार रिकी पॉँटिंगचा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाला सल्ला
भारतीय कर्णधार विराट कोहलीला दडपणात ठेवता येईल, अशी गोलंदाजी करणे ऑस्ट्रेलियाला शक्य आहे. स्वस्थ न बसता त्याला त्रस्त करण्याच्या प्रत्येक संधीचा उपयोग करा. कोणत्याही परिस्थितीत त्याला तुमच्यावर स्वार होऊन वर्चस्व गाजवण्याची संधी देऊ नका, असा सल्ला माजी कर्णधार रिकी पॉँटिंग यांनी ऑस्ट्रेलियन संघाला दिला आहे.
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी कसोटीपटू आणि भरवशाचे फलंदाज डीन जोन्स यांनी कोहलीला भडकवू नका, असा सल्ला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पॉंटिंग यांनी ऑस्ट्रेलियाला कोहलीबाबत स्वस्थ न बसण्याचा सल्ला दिला. ‘‘कोहलीला कुणी त्रस्तच करू शकत नाही, असा तो फलंदाज नाही. त्याला मी यापूर्वीदेखील अडखळताना बघितले आहे. जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर तो अनेक वेळा चाचपडत असल्याचे मी पाहिले आहे. त्यामुळे अत्यंत चांगली गोलंदाजी आणि त्याच्या आसपास तशीच देहबोली ठेवल्यास तो नक्कीच बिचकतो. त्यामुळे स्वस्थ बसून कुणालातरी आपल्यावर स्वार होऊ देणे, हे माझ्या तत्त्वात बसत नाही,’’ अशा शब्दांत पॉँटिंगने रोखठोक मते मांडली.
चार वर्षांपूर्वीच्या दौऱ्यात भारताने मालिका ०-२ अशी गमावली असली तरी कोहलीने चार शतकांसह ८६.२५ च्या सरासरीने ६९२ धावा फटकावल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पाँटिंग म्हणाला, ‘‘मायदेशात क्रिकेट खेळताना अत्यंत आक्रमक देहबोलीने खेळणे, हे ऑस्ट्रेलियाचे वैशिष्टय़ आहे. त्याच प्रकारे आम्ही आमचा सर्वोत्कृष्ट खेळ केला आहे. सध्याच्या संघाने आक्रमक मानसिकतेने न खेळणे हा मूर्खपणा ठरेल.
तुम्ही त्या खेळात आपला ठसा उमटवण्यासाठी आक्रमक व्हावेच लागते. तुम्हाला तुमचे कौशल्य आणि कृती वापरावीच लागते. मी कर्णधार असतो तर कोहलीला चांगली सुरुवात करताच येऊ नये, असे प्रयत्न केले असते. डावाच्या प्रारंभी त्याला कोणत्याही परिस्थितीत चौकार मारू न देण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याला कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक त्रस्त केले आहे, त्याचा विचार करता जेम्स अँडरसनचे नाव मनात येते.’’