सिडनी : स्टीव्ह स्मिथची अॅशेस कसोटी सामन्यातील द्विशतकी खेळी ही अलौकिक असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने म्हटले आहे. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनीही त्याला डॉन ब्रॅडमनची उपमा दिली आहे.
चेंडू फेरफार प्रकरणी १२ महिन्यांची बंदीची शिक्षा भोगल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या स्मिथने ओल्ड ट्रॅफर्डच्या चौथ्या कसोटी सामन्यात २११ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. अॅशेस मालिकेत त्याने लक्षवेधी १४७.२५ अशी फलंदाजीची सरासरी राखली आहे.
‘‘स्मिथच्या खेळीविषयी भाष्य करताना अनेक शब्द सुचले. परंतु अलौकिक हा एकच या खेळीचे वर्णन करण्यासाठी पुरेसा आहे. पुन्हा एकदा संस्मरणीय खेळी त्याने साकारली आहे. त्याने स्वत:ला पुन्हा सिद्ध केले आहे,’’ असे पाँटिंगने म्हटले आहे.
स्मिथने गेल्याच आठवडय़ात भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत ‘आयसीसी’ कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त केले आहे. कसोटी क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचे सर्वोत्तम फलंदाज म्हटल्या जाणाऱ्या ब्रॅडमन यांच्याशी स्मिथची आता तुलना होऊ लागली आहे.