येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी टी २० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत ऑस्ट्रेलियाच्या माजी विश्वचषक विजेत्या कर्णधाराने मोठे विधान केले आहे. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया टी २० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळतील, असे रिकी पाँटिंग म्हणाला आहे.
आयसीसीने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये बोलत असताना, रिकी पाँटिंगने अनेक पैलूंवर आपली मते मांडली. यावेळी त्याने टी २० विश्वचषक जिंकू शकतील अशा दोन संघांची नावे सांगितली. त्याच्या मते, भारत आणि ऑस्ट्रेलिया यावेळी अंतिम सामना खेळतील. अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवही स्वीकारावा लागेल, असेही तो म्हणाला.
एवढेच नाही तर त्याने पाकिस्तानी संघाबद्दलही आपले मत मांडले. तो म्हणाला, “पाकिस्तानच्या संघात विश्वचषक जिंकण्याची ताकद आहे, असे मला वाटत नाही. ते शाहीन आफ्रिदी आणि त्यांच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांवर जास्त अवलंबून आहेत. कर्णधार बाबर आझम या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकला नाही तर, पाकिस्तानचा या स्पर्धे टिकाव लागणार नाही.”
रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो क्रिकेटशी आपले नाते टिकवून आहे. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये तो समालोचनाचे काम देखील करतो. त्यामुळे टी २० क्रिकेटबद्दल त्याने केलेल्या वक्तव्याला महत्त्व दिले जात आहे.