२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, टीम इंडियामध्ये गटबाजी असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्याआधी कर्णधार विराट कोहलीने या सर्व शक्यता फेटाळून लावल्या होत्या. ३ ऑगस्टपासून भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळेले. पहिले २ टी-२० सामने हे अमेरिकेतल्या मियामी शहरात खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे.

मियामीमध्ये दाखल झाल्यानंतरही भारतीय संघातले खेळाडू दोन गटांमध्ये फिरताना दिसत आहेत. कर्णधार विराट कोहली आपली पत्नी अनुष्कासोबत तर उप-कर्णधार रोहित शर्मा ऋषभ पंत-शिखर धवन आणि इतर सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतो आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर भारतीय खेळाडूंचे फोटो आल्यानंतर, टीम इंडियामध्ये अजुनही गटबाजी कायम आहे की काय या चर्चेला आता सुरुवात झाली आहे.

विश्वचषकातून संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर रोहित शर्मा आपली पत्नी आणि मुलीसह संघाला मागे टाकून एकटा मुंबईत आला होता. उपांत्य सामन्यात विराट आणि रोहितमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र विराटने या वृत्ताचं खंडन केलं आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या विंडीज दौऱ्यातील कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader