Rinku Singh Gifts Sports Bike to Father: भारतीय संघाचा खेळाडू रिंकू सिंह सध्या चर्चेत आहे. हल्ली तो समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज हिच्याबरोबर लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. यानंतर प्रिया सरोजच्या वडिलांनी रिंकू आणि प्रिया यांचं लग्न होणार असल्याच्या बातम्यांना दुजोरा दिला. सध्या रिंकू सिंह इंग्लंडविरूद्धची टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान रिंकूच्या वडिलांचा एक व्हीडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहेत.
रिंकूचे वडील खानचंद सिंग एलपीजी सिलेंडरची डिलिव्हरी करायचे. रिंकू सिंग यशस्वी क्रिकेटर झाल्यानंतरही त्याचे वडील अजून तेच काम करतात. अलीकडेच रिंकूने तिच्या वडिलांना कावासाकी निन्जा 400 स्पोर्ट्स बाइक भेट दिली आहे. या बाईकची किंमत ५ लाखांपेक्षा जास्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये रिंकूचे वडील दुचाकीवर बसून जाताना दिसत आहेत. रिंकूने वडिलांनी दिलेली ही भेट पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत.
आयपीएल खेळण्यापूर्वी रिंकूचे कुटुंब आर्थिक संकटाशी झुंजत होते. पण आयपीएलमध्ये यश मिळवल्यानंतर या स्टार खेळाडूने केवळ आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार तर लावलाच पण संघाला गरीबीतूनही बाहेर काढले. रिंकू सिंहचे आय़पीएलच्या अखेरच्या षटकातील ५ चेंडूत ५ षटकार त्याच्या कारकिर्दीला आणि एकंदरीच त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. रिंकूला गुजरातविरूद्धचा तो सामना केकेआरला जिंकून दिल्यानंतर भारतीय संघातही स्थान मिळाले. यानंतर रिंकूची सातत्याने चांगली कामगिरी सुरूच आहे.
रिंकू सिंह लवकरच विवाहबंधनात अडकणार
रिंकू सिंह लवकरच सपा खासदार प्रिया सरोजबरोबर लग्न करणार आहे. प्रिया सरोजचे वडील तुफानी सरोज यांनी पीटीआयशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, रिंकू आणि प्रिया एकमेकांना एका वर्षाहून अधिक काळापासून ओळखतात. ते दोघेही एकमेकांना पसंत करत होते, पण त्यांच्या नात्यासाठी त्यांना त्यांच्या घरच्यांची संमती आवश्यक होती. दोन्ही कुटुंबीयांनी या लग्नाला होकार दिला आहे.
रिंकू सिंह हा भारताच्या टी-२० संघातील नियमित सदस्य आहे. २२ जानेवारी म्हणजेच आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. भारताला इंग्लंडविरूद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.