निवृत्तीचा निर्णय घेणे हे काही सोपे नसते. हा निर्णय घेताना खूप विचार करावा लागतो. कोणत्याही खेळाडूने किंवा कलाकाराने योग्य वेळी हा निर्णय घेतला पाहिजे, असे आपण नेहमी म्हणतो. या लोकांनी कीर्तीच्या शिखरावर असतानाच हा निर्णय घेणे अधिक चांगले मानले जाते. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने स्पर्धात्मक नेमबाजीतून निवृत्त होण्याचा मानस व्यक्त केला आहे.
अभिनवचा हा निर्णय कदाचित त्याच्या काही चाहत्यांना आवडणार नाही. त्यांच्यासाठी हा मोठा धक्काही आहे. मात्र ऑलिम्पिकसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी आवश्यक असणारी अचूकता आपल्याकडे राहिलेली नाही, याची त्याला जाणीव झाली असावी. त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला असावा. लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच त्याने हा निर्णय घेत अन्य युवा खेळाडूंसाठी मार्ग मोकळा केला आहे. त्याने आतापर्यंत चार ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेतला. त्यापैकी २००८च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने सोनेरी यश मिळवीत ऐतिहासिक कामगिरी केली.
अभिनवला ‘नेमबाजीचा युगकर्ता’ असेही म्हटले जाते. विश्वनाथन आनंदने बुद्धिबळात विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर या खेळाची लोकप्रियता वाढली व अनेक शालेय मुलामुलींना त्यामध्ये कारकीर्द घडवण्यासाठी प्रेरणा मिळाली. प्रकाश पदुकोण व पुलेला गोपीचंद यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतरही या खेळाला अपेक्षेइतकी गती मिळाली नव्हती. ते काम सायना नेहवालच्या कामगिरीने केले. त्याप्रमाणेच अभिनवने नेमबाजीतील करिअर हे उपजीविकेचे साधन होऊ शकते, हे दाखवून दिले. त्याच्या सुवर्णपदकानंतर जागतिक दर्जाचे नेमबाजी केंद्र देशात अनेक ठिकाणी पाहिजे, याची जाणीव संघटकांना झाली. देशात कोठेही अखिल भारतीय स्तरावर नेमबाजी स्पर्धा आयोजित केली गेली, तर त्यामध्ये वयाच्या १०व्या वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंतचे एक हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होत असतात, ही अभिनवच्या कार्याचीच पावती आहे.
अपघातामुळे किंवा घातपाती कृत्यामुळे रायफलचे नुकसान होणे ही अभिनवसाठी काही नवीन गोष्ट नाही. किंबहुना बीजिंग येथील ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले, त्या वेळी प्राथमिक फेरी व अंतिम फेरी यामधील विश्रांतीच्या काळात त्याची रायफल मोडण्याचा प्रयत्न झाला होता. अभिनवच्या जागी अन्य कोणी खेळाडू असता तर त्याने आकाडतांडव केले असते. मात्र अभिनवने या घातपाती कृत्याबद्दल कोणतीही तक्रार केली नाही किंवा गाजावाजा केला नाही. शांत चित्त, संयम व खिलाडूवृत्तीने त्याने या घटनेकडे पाहिले आणि अंतिम फेरीत फक्त आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच तो सुवर्णपदक जिंकू शकला. रिओ येथे यंदा त्याच्या रायफलचे अपघातामुळे खूपच नुकसान झाले. साहजिकच त्याला जुन्या रायफलचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे त्याला अपेक्षेइतके यश मिळवता आले नाही. त्याने मिळवलेला चौथा क्रमांकदेखील खूप मोठी कामगिरी आहे. नेमबाजीमध्ये अचूकता, एकाग्रता याच्याबरोबरच नशिबाचाही मोठा वाटा असतो. दुर्दैवाने यंदा अभिनवला अंतिम फेरीत नशिबाने साथ दिली नाही.
अभिनव हा जरी स्पर्धात्मक नेमबाजीतून निवृत्त होणार असला, तरी त्याने मिळवलेले ऑलिम्पिक सुवर्णपदक हे देशातील युवा पिढीला कायमच प्रेरणादायक राहणार आहे. एखाद्या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यात शतक टोलवले की तो लगेच हवेत तरंगल्यासारखेच वावरत असतो. अभिनवला अशी कधीही गर्वाची बाधा झालेली नाही. तो कायमच जमिनीवरच राहिलेला खेळाडू आहे. ऑलिम्पिकमध्ये सर्वोच्च यश मिळवण्यासाठी किती व कसे कष्ट घ्यावे लागतात, हे त्याने दाखवून दिले आहे. तो जरी निवृत्त झाला, तरी तो भारतीय क्रीडा क्षेत्राचा अतुलनीय सदिच्छादूतच राहणार आहे.