महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबर हिला लवकरच राज्य सरकार नोकरी देणार असल्याची घोषणा फडणवीस सरकारने केली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राची ऑलिम्पिकपटू ललिता बाबर हिला दहावे स्थान मिळाले होते. ललिता बाबर रविवारी मायदेशी परतली तेव्हा तिचे राज्याच्या क्रीडा व युवक संचालनालयातर्फे तिचे पुणे विमानतळावर थाटामाटात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आज तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ललिता बाबरचा गौरव केला. तसेच यापुढेही राज्य सरकार तिला हवी ती मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले. याशिवाय, ललिता बाबरला फडणवीस यांनी सरकारी नोकरी देखील दिल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याच्या भेटीवेळी राज्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे देखील उपस्थित होते. विनोद तावडे यांनीही ललिता बाबरच्या कामगिरीचे कौतुक केले.

वाचा: पुरेशा विश्रांतीअभावी पदकाची संधी हुकली -ललिता

ललिता बाबर हिने रिओ ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक फेरीत ९ मी.१९.७६ सेकांदाची वेळ नोंदवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र, अंतिम फेरीत तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. प्राथमिक फेरीत पायाला दुखापत झाल्याने आणि अंतिम फेरीपूर्वी अपेक्षेइतकी विश्रांती न मिळाल्याने पदकापासून वंचित राहावे लागले, अशी प्रतिक्रिया ललिताने मायदेशात परतल्यानंतर दिली. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचे ध्येय असल्याचेही तिने सांगितले.