कलात्मक जिम्नॅस्टीक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपा कर्माकर हिला खेलरत्न पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार खेलरत्न पुरस्कारासाठी दीपाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडादिनी दीपाला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे समजते. उद्या याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे.७.५ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे खेलरत्न पुरस्काराचे स्वरूप असते. सध्या सुरू असलेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाने जिम्नॅस्टिक व्हॉल्टच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, केवळ ०.१५० गुणांनी दीपाचे कांस्य पदक हुकले होते.  स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यानंतर देशभर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. १९६४ नंतर प्रथमच या प्रकारात एका भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे, वॉल्टच्या ‘प्रोड्युनोवा’ प्रकारात दीपाचा हातखंडा असल्यामुळे तिच्याबद्दल अनेकांना अप्रूप आहे. दीपाने ग्लास्गो येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत जिम्नॅस्टिक्समधील ‘प्रोड्युनोवा’ प्रकाराचा अडथळा यशस्वीरित्या पार केला होता. त्यामुळे दीपाची जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण झाली.
भारताची जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि धावपटू ललिता बाबर यांच्या नावाने ट्रेन आणि विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने सरकारकडे केली आहे. सेहवागने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे ही विनंती केली. प्रत्येकजण उगवत्या सुर्याला सलाम करतो. दीपा आणि ललिता यांना ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळाले नसले तरी त्यांची प्रवाहाविरुद्ध पोहण्याची जिद्द कौतुकास्पद आहे. आपण त्यांच्या या प्रयत्नांचा सन्मान केला पाहिजे, असे वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.