२०२० मध्ये टोकिओत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताला निश्चितच सुवर्णपदक मिळेल असा विश्वास रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केला.
हैदराबाद येथील गचीबाऊली स्टेडिअमवर तेलंगणा सरकारच्या वतीने आयोजित सत्कारानंतर माध्यमांशी ते बोलत होते. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक मिळवले होते. तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पदकावर आपली मोहोर उमटवली. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी टोकिओ ऑलिम्पिकबाबत आपली अपेक्षा व्यक्त केली.
ते म्हणाले, रिओ ऑलिम्पिकची तयारी करताना सिंधूला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. अनेक तडजोडी कराव्या लागल्या. तरीही तिने कधी सक्त प्रशिक्षणाची तक्रार केली नाही. तिच्या या कष्टाचेच हे फळ आहे. पदक मिळवण्याची सिंधूमध्ये क्षमता होती, असेही ते म्हणाले.
आम्ही फार पूर्वीपासून ऑलिम्पिकसाठी तयारी करत होतो. सुदैवाने रिओमध्ये आम्हाला एकत्रित राहण्याची संधी मिळाली. त्याचा नियोजन करण्यासाठी मोठा फायदा झाला, असे एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले.
पदकामुळे स्वप्न सत्यात
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्यामुळे माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. पदक प्राप्तीचा आनंद खरंच वेगळा आहे. या यशात प्रशिक्षक गोपीचंद यांच्यासह आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. गोपीचंद यांच्यामुळेच मी इथवर पोहोचले. माझ्यापेक्षा त्यांनी खूप परिश्रम घेतले. हैदराबाद येथे झालेल्या उत्स्फुर्त स्वागतामुळे मला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया पी. व्ही. सिंधूने या वेळी दिली. गोपीचंद यांनी माझ्याकडून तयारी करून घेतल्यामुळे मला हे यश मिळू शकले असेही तिने यावेळी म्हटले.