‘सातत्याचा अभाव’ हे बिरुद चपखल बसलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाची सध्याची कामगिरी लक्षात घेता कधी काळी आपल्या संघाने ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आठ वेळा विजेतेपद मिळवत सुवर्णयुग निर्माण केले होते, असे कोणास सांगूनही खरे वाटणार नाही. अलीकडे भारताने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत उपविजेतेपद मिळवत सनसनाटी कामगिरी केली असली, तरी ऑलिम्पिक स्पर्धा ही खूपच वेगळी असते आणि तेथील अक्षम्य चुकादेखील महागात पडत असतात. हे लक्षात घेत भारतीय हॉकीपटूंसाठी ऑलिम्पिक पदक हे मृगजळासारखेच आहे.
ऑलिम्पिकच्या इतिहासात डोकावले तर एके काळी भारतीय हॉकी संघाचा जगात दरारा होता. मेजर ध्यानचंद यांना ‘हॉकीचे जादूगार’ मानले जात असे. त्यांनी १९२८ ते १९३६ अशा तीन ऑलिम्पिकमध्ये संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. भारतीय हॉकीचा मजबूत पाया रचण्याचे श्रेय त्यांना जाते. १९२८ ते १९५६ या कालावधीत भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवले. दोन महायुद्धांमुळे १९४० व १९४४च्या ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. अन्यथा भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. भारताची सुवर्णपदकांची मालिका पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानने १९६० मध्ये खंडित केली. अंतिम फेरीत त्यांनी भारताला हरवले. १९६४च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध पराभवाची परतफेड करीत पुन्हा सोनेरी कामगिरी केली. त्यानंतर १९८०च्या ऑलिम्पिकचा अपवाद वगळता भारतीय हॉकी संघाच्या पदरी निराशाच पडली आहे. १९८० मध्ये मॉस्को येथे झालेल्या ऑलिम्पिकवर ऑस्ट्रेलियासह अनेक बलाढय़ देशांनी बहिष्कार घातला होता. त्याचा फायदा घेत भारताने विजेतेपद मिळवले.
आशियाई देशांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी युरोपियन देश तसेच ऑस्ट्रेलिया यांनी कृत्रिम मैदानांचा उपयोग करण्याचे बंधन घातले आणि मातीच्या मैदानावर प्रभुत्व गाजवणाऱ्या भारताची पीछेहाटच होत गेली. त्यातच हॉकी क्षेत्रातील गलिच्छ राजकारण, संघटना स्तरावर असलेली उदासीनता, प्रशिक्षकांमध्ये सातत्याने बदल करणे, खेळाडू व प्रशिक्षक यांच्यामधील विश्वासाचा अभाव व विसंवाद, संघनिवडीबाबत दिसून येणारे राजकारण, प्रायोजकांबाबत वानवा आदी अनेक कारणांमुळे भारतीय हॉकी क्षेत्र डबघाईला आले. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ असूनही २००८च्या ऑलिम्पिकसाठी आपला संघ पात्रता पूर्ण करू शकला नाही, याहून आणखी दुर्दैव कोणते.
भारतीय हॉकी संघाने २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सनसनाटी विजेतेपद पटकावत ऑलिम्पिक प्रवेशही निश्चित केला. या विजेतेपदासह भारताने गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स स्पर्धेतील उपविजेतेपद ऑलिम्पिक पदकासाठी प्रेरणादायक आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या सर्वोत्तम संघास पेनल्टी शूटआऊटपर्यंत झुंज दिली ही भारताची जमेची बाजू असली, तरी या पेनल्टी शूटआऊटसह अनेक संधी भारताने वाया घालविल्या. हीच गोष्ट भारतासाठी चिंताजनक आहे. ऑलिम्पिकमध्ये अशा चुका सामन्याला कलाटणी देऊ शकतात. साखळी गटात भारतास जर्मनी, नेदरलॅण्ड्स, अर्जेटिना या तुल्यबळ संघांबरोबर दोन हात करावे लागणार आहेत. हे लक्षात घेता पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करण्याबाबत अचूकता, खेळाडूंमधील समन्वय, बचावफळीत कशी भक्कम कामगिरी राहील यावरच भारताचे यशापयश अवलंबून आहे.
महिलांच्या विभागात भारताने पात्रता निकष पूर्ण केले, हीच खूप मोठी कामगिरी आहे. यापूर्वी १९८० मध्ये मॉस्को येथे अन्य संघांच्या उपस्थितीत भारताला स्पर्धेत प्रवेश मिळाला होता. त्यानंतर ऑलिम्पिक प्रवेशापासून भारतीय संघ दूरच राहिला आहे. साखळी गटात किती सामने हा संघ जिंकणार, हीच एकमेव उत्सुकता आहे.
भारतीय संघ : पी. आर. श्रीजेश (गोलरक्षक आणि कर्णधार), हरमनप्रीत सिंग, रूपिंदरपाल सिंग, कोठाजित सिंग, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, सरदार सिंग, व्ही. आर. रघुनाथ, एस. के. उथप्पा, डॅनिश मुज्तबा, देविंदर वाल्मीकी, एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, चिंगलेन्साना सिंग, रमणदीप सिंग, निक्किन थिमय्या.
भारतीय महिला संघ: सुशीला चानू (कर्णधार आणि बचावपटू), नवज्योत कौर, दीपग्रेस इक्का, मोनिका, निक्की प्रधान, अनुराधा देवी, थॉमचॉम, सविता, पूनम राणी, वंदना कटारिया, दीपिका (उपकर्णधार), नमिता टोप्पो, रेणुका यादव, सुनीता लाक्रा, राणी, प्रीती दुबे, लिलिमा मिन्झ.
राखीव खेळाडू : हॅल्युम लाल रुआट फेली, रजनी इटीमार्पू (गोलरक्षक)
मुख्य प्रशिक्षक : रोलँट ओल्टमन्स, विश्लेषण प्रशिक्षक रॉजर व्हान जेंट, प्रशिक्षक : तुषार खांडकर, तंदुरुस्तीतज्ज्ञ : श्रीकांत अय्यंगार, दृक्श्राव्य विश्लेषक : आदित्य चक्रवर्ती, मसाजर : अरूप नस्कर, वैद्यकीय तज्ज्ञ : केंजोम नगोमदिर.
milind.dhamdhere@expressindia.com