भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा व सवलतींअभावी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवू शकत नाही अशी नेहमी ओरड केली जात असते. मात्र ज्येष्ठ ऑलिम्पिक धावपटू पी. टी. उषा यांच्यासह पूर्वीच्या काळातील खेळाडूंशी तुलना केल्यास भारतीय खेळाडूंना भरपूर सुविधा व सवलती मिळत असतात. मात्र केवळ इच्छाशक्ती व सर्वोच्च आत्मविश्वास याच्या अभावी हे खेळाडू ऑलिम्पिक पदकापासून दूर राहिले आहेत.

महाराष्ट्राचे महान कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी येथे १९५२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले. त्या वेळी त्यांना फारशा सुविधाही मिळत नव्हत्या. हल्लीच्या काळातील खेळाडूंना ज्या सुविधा व सवलती मिळत आहेत, तशा सुविधा त्यांना मिळाल्या असत्या तर त्यांनी किमान दोन वेळा सुवर्णपदक जिंकले असते. सतत रडण्याची वृत्ती हल्लीच्या खेळाडूंमध्ये अनेक वेळा दिसून येते. दक्षिण आफ्रिका खंडातील छोटय़ा-छोटय़ा देशांमधील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करीत असतात. दोन वेळची खायची भ्रांत आहे, अशा परिस्थितीवर मात करणारे अनेक परदेशी खेळाडू ऑलिम्पिकमध्ये हमखास यश मिळवत असतात. आम्हाला काही सुविधा व सवलती मिळत नाहीत, मग आम्ही ऑलिम्पिकमध्ये पराक्रम कसा करणार, असा विचारही ते कधी करीत नाहीत.

ऑलिम्पिक नेमबाज गगन नारंगला सुरुवातीला परदेशी बनावटीची रायफल घेण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी घरावर कर्ज काढून आर्थिक निधी उपलब्ध करून दिला. आपल्या पालकांचे हे ऋण आपल्यावर आहे, याची जाणीव त्याला होती. त्यामुळेच लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये तो पदक मिळवण्याचे स्वप्न साकारू शकला.

अल्पसंतुष्ट वृत्ती हा आपल्या खेळाडूंमध्ये दिसून येणारा स्थायीभाव आहे. गल्लीतच दादागिरी करण्याबाबत आपले खेळाडू समाधान मानत असतात. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील ‘महाराष्ट्र केसरी’ हा अतिशय प्रतिष्ठेचा किताब मानला जातो. अनेक वेळा हा किताब जिंकल्यानंतर विजॉयी मल्ल स्पर्धात्मक कुस्तीपासून दूर जातो. आपण पुन्हा कुस्ती खेळलो व पराभूत झालो तर केसरी किताबाद्वारे मिळालेली शान व शौकत मिळणार नाही अशी भीती त्याला वाटत असते. जागतिक स्तरावर चमक दाखविण्याची क्षमता असलेले अनेक मल्ल महाराष्ट्रात आहेत. परंतु त्यांची मजल केवळ आपल्या राज्यातच मर्दुमकी गाजविण्यापर्यंतच असते.

आपल्या देशात कौटुंबिक समारंभ, धार्मिक उत्सव याचा विलक्षण प्रभाव निर्माण झाला आहे. चीनमध्ये राष्ट्रीय शिबिरात सहभागी झालेल्या खेळाडूंना वर्षांतील तीनच दिवस सुट्टी दिली जाते. त्यांच्या खेळाडूंना कौटुंबिक समारंभ, धार्मिक उत्सवापासून दूरच ठेवले जाते. कोणत्याही खेळाडूने राष्ट्रीय शिबिरापासून तीन दिवस सुट्टी घेतली तरी त्याच्याकरिता तयार केलेले व्यायाम व स्पर्धात्मक सरावाचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता असते म्हणूनच चीनमध्ये राष्ट्रीय संघातील खेळाडूंना केवळ तीनच दिवस सुट्टी असते. आपल्याकडे कौटुंबिक समारंभ, धार्मिक उत्सवांमध्ये अनेक खेळाडूंचा वेळ जात असतो. त्याचप्रमाणे घरापासून दूर अंतरावर असलेल्या शिबिरात त्यांची एकाग्रता टिकत नाही. आई-वडिलांपासून बराच कालावधी दूर राहिल्यानंतर त्यांच्यात वैफल्य निर्माण होते.

‘सुपरमॉम’ म्हणून ख्याती असलेल्या एम. सी. मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेपूर्वी ती जवळजवळ दोन वर्षे घरापासून दूर अंतरावर सराव करीत होती. घराजवळ राहिलो तर आपल्या दोन जुळ्या मुलांची सतत आठवण येत राहील व त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या कामगिरीवर होईल हे ओळखूनच ती दूर राहिली होती. मनावर दगड ठेवतच तिने ऑलिम्पिकसाठी सराव केला व कांस्यपदकाचे स्वप्न साकार केले.

परिस्थितीशी संघर्ष करीत ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या परदेशी खेळाडूंचा आदर्श आपल्या खेळाडूंनी ठेवला पाहिजे. ज्या काही सुविधा व सवलती मिळाल्या आहेत, त्याचा उपयोग करीत देशाला कसा नावलौकिक मिळवून देता येईल, याचा विचार आपल्या खेळाडूंनी केला पाहिजे.      (क्रमश:)

– मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com