ऑलिम्पिक पदक विजेता केवळ एक-दोन वर्षांच्या तपश्चर्येद्वारे तयार होत नसतो. त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत आवश्यक असते. क्रीडा क्षेत्र हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मनामनांत रुजले असेल तरच खऱ्या अर्थाने क्रीडाविकास होऊ शकतो. त्याकरिता खोलवर रुजलेल्या क्रीडा संस्कृतीची आवश्यकता असते. मात्र आपल्या देशात अशा संस्कृतीचाच अभाव आहे.

मध्यंतरी चीनमधील जिम्नॅस्टिकपटू कसे तयार होतात याविषयी एका नियतकालिकेत छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. दीड-दोन वर्षांच्या मुलामुलींना एका आडव्या लाकडी बारवर शीर्षांसन स्थितीत बांधण्यात आले होते, असे ते छायाचित्र होते. कोणत्या मुलामुलींमध्ये कोणत्या खेळात प्रावीण्य मिळविण्याची क्षमता आहे याचे लहानपणापासूनच नियोजन करीत त्यानुसार त्यांच्या विकासाची योजना अमलात आणण्यात येते. आपल्या देशात शिक्षणाला सर्वात अधिक प्राधान्य असते. अनेक खेळांमध्ये विशेषत: बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स आदी वैयक्तिक क्रीडा प्रकारातील मुले-मुली कुमार गटापर्यंतच चमक दाखवीत असतात. दहावी व बारावी परीक्षांमुळे त्यांना क्रीडा क्षेत्राऐवजी शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागते. कारण एखाद्या खेळात प्रावीण्य दाखविले तरी अर्थार्जनाची हमी नसते व शिक्षणातील यशाच्या जोरावर त्याला अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळतो. या क्षेत्रामधील यश त्यांना गलेलठ्ठ अर्थार्जनाची हमी देत असते.

शाळा व महाविद्यालयांमध्ये खेळाडूंचा विकास होऊ शकतो, मात्र या स्तरावरच प्रगती होण्याऐवजी अनेक खेळाडूंमध्ये भविष्याविषयी नकारात्मक वृत्ती निर्माण होते. या स्तरावर आवश्यक असणारे अव्वल दर्जाचे मार्गदर्शन, चांगल्या दर्जाच्या क्रीडा सुविधा, आव्हानात्मक स्पर्धा त्यांना मिळणे आवश्यक असते. प्रत्यक्षात या स्तरावरील स्पर्धा म्हणजे केवळ औपचारिकतेचाच भाग असतो. बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल आदी अनेक स्पर्धामध्ये भरपूर प्रवेशिका असतात. एके दिवशी खेळाडूला लागोपाठ चार-पाच सामने खेळावे लागतात. कारण संयोजकांकडे मर्यादितच आर्थिक निधी असतो व या निधीमध्ये दोन किंवा तीन दिवसांमध्ये त्यांना हे सामने उरकावे लागतात. स्थानिक स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंतच्या स्पर्धामध्ये प्रत्येक स्तरावरील स्पर्धामध्ये विजयी संघ पुढे जात असतो. काही खेळांमध्ये पंचांचा एखादा चुकीचा निर्णयदेखील सामन्याच्या निकालावर अनिष्ट परिणाम करू शकतो. चुकीच्या निर्णयामुळे पराभूत झालेल्या गुणवान खेळाडूवर राष्ट्रीय स्पर्धेची संधीदेखील गमाविण्याची वेळ येते.

क्रीडा शिक्षक हा खरे तर खेळाडूंच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा दुवा असतो. मात्र त्याच्यासारखा उपेक्षित घटक या समाजात नाही, असे म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. शाळा व महाविद्यालयांमधील क्रीडा शिक्षकांना अन्य शिक्षकांच्या अनुपस्थितीत त्याचा वर्ग सांभाळणे, विद्यार्थ्यांच्या सहलीसोबत जबाबदार व्यक्ती म्हणून जाणे, स्नेहसंमेलनाची कामे सांभाळणे आदी कामेच जास्त करावी लागतात. मुळातच शाळा व महाविद्यालयांमध्ये क्रीडा शिक्षकांची कमतरता आहे.

क्रीडा क्षेत्रात करिअर करता येते हीच संकल्पना अद्याप आपल्या लोकांमध्ये भिनलेली नाही. त्यामुळे नैपुण्य असूनही पालकांच्या सहकार्याच्या अभावी खेळाडूंना हे करिअर करता येत नाही. खेळाडूंना पालकांकडून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. काही पालक खूप चांगले सहकार्य करीतही असतात, मात्र काही वेळा पालकांकडून होणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली खेळाडूंच्या करिअरवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. आपल्या मुलाने हातात बॅट घेतली की लगेच त्याने सचिन तेंडुलकर व्हावे किंवा मुलीने हातात बॅडमिंटनची रॅकेट घेतली की तिने सायना नेहवालसारखे यश मिळवावे अशीच त्यांची अपेक्षा असते. सचिन व सायना यांना जागतिक स्तरावर सहजासहजी यश मिळाले नाही. त्यांनाही अनेक वर्षे मेहनत करावी लागली हे मुद्दे त्यांच्या लक्षात येत नाहीत.

चीन, अमेरिका, जमेका, केनिया, जपान, दक्षिण कोरिया आदी देशांमध्ये खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय करिअर साधारणपणे पंधरा वर्षांखालील गटातच सुरू होते. त्यामुळेच त्यांचे खेळाडू वरिष्ठ गटात आल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करतात. लहानपणीच क्रीडा क्षेत्राचा पाया घालण्यासाठी खेळाडू, पालक, शिक्षक यांची योग्य रीतीने सांगड घालण्याची आवश्यकता आहे, तरच मोठेपणी हे खेळाडू अव्वल दर्जाचे यश मिळवू शकतील.         (क्रमश:)

 

– मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com