कोणताही खेळाडू महान असला, तरी त्याच्याही कामगिरीबाबत काही मर्यादा असतात. त्याने आता निवृत्त होत युवा खेळाडूला संधी द्यावी अशी सांगण्याची वेळ येऊ नये. भारताचा टेनिसपटू लिएण्डर पेस याच्याबाबत अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. तंदुरुस्ती, देशनिष्ठा, खेळावरील प्रेम, असाधारण व्यक्तिमत्त्व याबाबत तो खरोखरीच आदर्श खेळाडू आहे. मात्र त्याने बालहट्ट बंद करावेत अशीच वेळ आली आहे.

भारताला आतापर्यंत टेनिसमध्ये जे एकमेव पदक मिळाले आहे, ते पेस याच्या कामगिरीमुळेच. त्याने अटलांटा येथे १९९६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. या पदकाच्या जोरावर आणि दुहेरीतील जागतिक स्तरावरील सातत्यपूर्ण यशामुळे त्याने सलग सात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वैयक्तिक खेळात सलग सात ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेणारा तो एकमेव भारतीय खेळाडू तसेच जगातील पहिला टेनिसपटू आहे. प्रौढत्वाकडे झुकलेला असूनही तो ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये अजूनही अजिंक्यपद मिळवत आहे. त्यामध्ये त्याचे खेळावरील असलेले निस्सीम प्रेम, जिगरबाज वृत्ती स्पष्ट होते. महेश भूपतीच्या साथीने खेळत असताना या जोडीने मिळवलेल्या यशामध्ये पेसबरोबरच भूपतीचाही तितकाच महत्त्वाचा वाटा होता.

भूपती व पेस ही जोडी वेगळी झाल्यानंतर पेसला ऑलिम्पिकमध्ये योग्य साथ देईल असा साथीदार भेटला नाही, किंबहुना अलीकडच्या काळात भारताच्या युवा खेळाडूंना त्याची साथ नको असते, हे अनेक वेळा दिसून आले आहे. केवळ पुरुष दुहेरी नव्हे तर मिश्र दुहेरीतही तोच अनुभव प्रत्ययास आला आहे. गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये तसेच अनेक डेव्हिस चषक लढतींमध्ये युवा खेळाडूंनी नाइलाजास्तव पेसच्या साथीत खेळण्यास मान्यता दिली आहे. कित्येक वेळा वडील व मुलगा जोडी खेळत आहे की काय, अशी शंका यावी एवढे वयाचे अंतर पेस व त्याच्या सहकाऱ्यामध्ये दिसून येत असे.

रिओ येथील ऑलिम्पिकमध्येही त्याच्या समावेशावरून केवढे तरी वादळ निर्माण झाले होते. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने पेसची कदाचित ही अखेरची ऑलिम्पिक असण्याची शक्यता गृहीत धरून त्याला पुरुष दुहेरीत संधी दिली. रोहन बोपण्णाने नाइलाजास्तव त्याच्या साथीने खेळण्यास मान्यता दिली. मात्र या जोडीत यापूर्वी फारसा सुसंवाद नव्हता. या जोडीने दक्षिण कोरियाविरुद्धच्या डेव्हिस लढतीत विजय मिळवला. ऑलिम्पिकपूर्वीची त्यांच्यासाठी ही रंगीत तालीम होती; तथापि प्रत्यक्षात रिओ येथे वेगळेच चित्र दिसून आले. मुळातच पेस हा रिओला खूप उशिरा पोहोचला. साहजिकच या जोडीला सरावासाठी फारसा वेळही मिळाला नाही. प्रत्यक्ष लढतीमध्ये त्यांच्या खेळात समन्वयाचा अभावच दिसून आला. जर या खेळाडूंमध्ये सुसंवाद असता तर कदाचित वेगळे चित्र दिसून आले असते.

पेसने गेल्या तीन वर्षांमधील कटू अनुभव लक्षात घेऊन शहाणे व्हायला हवे. जर अन्य खेळाडू, प्रशिक्षक व संघटकांसाठी तो नकोसा असेल, तर त्याने वेळीच निवृत्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे. जर अजूनही त्याला ग्रँड स्लॅम स्पर्धासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये खेळायचे असेल, तर अन्य परदेशी खेळाडूंसमवेत खेळण्याचा पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध आहे. भारताला आवश्यकता वाटल्यास संघटक त्याची निवड निश्चितपणे करतील. पेसने रिओ येथे स्वतंत्र खोली मिळवण्यासाठी खूप थयथयाट केला. खरे तर पेससारख्या स्वाभिमानी व महान खेळाडूला हे वर्तन शोभत नाही. त्याने असा हट्ट करणे उचित नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रीय संघटकांनीही त्याचे बालहट्ट किती दिवस पुरवायचे याचाही गांभीर्याने विचार केला पाहिजे.

milind.dhamdhere@expressindia.com