रिओ ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी ६५ किलो वजनी गटाच्या कुस्तीत मंगोलियाच्या गांझोरिग याला पराभवाला सामोरे जावे लागले. उझबेकिस्तानच्या इख्तियोर नावरुझोवविरुद्धच्या या लढतीत पंचांनी दिलेला निर्णय अयोग्य असल्याचे गांझोरिग आणि त्याच्या प्रशिक्षकांचे म्हणणे होते. मात्र, इख्तियोर याला विजयी घोषित केल्याने गांझोरिगच्या प्रशिक्षकांनी पंचांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी थेट मॅटवर जाऊन आपले कपडे काढले. ६५ किलो वजनी गटातील ही लढत कांस्य पदकासाठीची होती. दोन्ही स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. अखेरच्या मिनिटापर्यंत सामना रंगला. सामना संपल्यानंतर दोन्ही स्पर्धकांनी विजयाचा जल्लोष देखील सुरू केला. प्रेक्षकांनाही विजेता कोण हे काही कळेनासे झाले होते. अखेर पंचांनी उझबेकिस्तानच्या इख्तियोर याला विजयी घोषित केले आणि मंगोलियाच्या सेलिब्रेशनवर पाणी फेरले. पंचांनी दिलेल्या निर्णयाने मंगोलियाच्या प्रशिक्षकांनी धक्काच बसला. त्यांनी थेट मॅटवर जाऊन स्वत:चे कपडे उतरवून आपला राग व्यक्त केला.