ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणे महत्त्वाचे नसून त्यामध्ये भाग घेणे हे अधिक महत्त्वाचे असते, असे आधुनिक ऑलिम्पिकचे जनक बॅरन डी क्युबर्टीन हे नेहमीच म्हणत असत. भारतीय खेळाडू गेली अनेक वर्षे त्यांच्या मताचा आदर ठेवत भाग घेत आहेत. आजपर्यंतच्या इतिहासापैकी आपले सर्वात मोठे पथक यंदा रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहे, मात्र अद्यापही पदक तालिकेत भारताचे नाव नोंदवले गेलेले नाही.
ऑलिम्पिकमधील सहभागदेखील महत्त्वाचा असतो, यात तिळमात्र शंका नाही. मात्र सव्वाशे कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या देशातून खरे तर किती तरी पदकविजेते खेळाडू प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये घडणे अपेक्षित आहे. लोकसंख्या व आकारमान याबाबत भारतापेक्षा खूपच लहान असलेले जमैका, हंगेरी, इथिओपिया, केनिया आदी देश प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट करीत असतात. केनिया, इथिओपिया, युगांडा, टांझानिया आदी अनेक देश भारताच्या तुलनेत आर्थिक, शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेले देश आहेत. त्यांचे खेळाडू अनेक ऑलिम्पिक स्पर्धा गाजवितात, मात्र भारतालाच त्यांच्यासारखे यश मिळवता येत नाही. प्रत्येक वेळी त्यांचे अनेक नवनवीन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करतात.
घोडय़ाला तुम्ही पाण्यापर्यंत नेले तरी पाणी प्यायचे की नाही, याचा निर्णय तो घोडा घेत असतो. याचप्रमाणे भारतीय खेळाडूंना आता भरपूर सुविधा व सवलती मिळत असल्या तरी ऑलिम्पिकमध्ये एकाग्रतेने भाग घ्यायचा की नाही, हे संबंधित खेळाडू ठरवत असतो. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे ही काही सोपी गोष्ट नसली तरी अशक्य या व्याख्येत बसणारी ही नक्कीच नाही. शासकीय मदतीचा अभाव, परदेशातील स्पर्धामध्ये सहभागाचा अभाव, अव्वल दर्जाच्या प्रशिक्षकांची वानवा आदी कारणे पूर्वीच्या काळात सांगितली जात होती. मात्र गेल्या १०-१२ वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंना भरपूर सुविधा, सवलती मिळत आहेत. त्यांच्या इच्छेनुसार परदेशात प्रशिक्षण किंवा परदेशी प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन आदी सवलतीही मिळत आहेत, तरीही भारतीय खेळाडूंबाबत पदकांचा दुष्काळच दिसून येत आहे.
‘नाचता येईना, अंगण वाकडे’ असे नेहमीच उपहासाने म्हटले जाते. अर्थात अशा स्वरूपाची तक्रार भारतीय खेळाडूंकडून केली जात असते. आपली स्पर्धा सुरू असताना जोरदार वारे वाहत होते अशी तक्रार भारतीय तिरंदाजांकडून केली गेली. त्यांची ही तक्रार खरोखरीच हास्यास्पद आहे. भारतीय खेळाडू तिरंदाजी करीत असतानाच फक्त वारे असते व अन्य खेळाडूंच्या वेळी नसते असेच जणू काही त्यांना वाटत असते. या खेळाडूंनी खरे तर अभिनव बिंद्राचा आदर्श ठेवला पाहिजे होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्राथमिक व अंतिम फेरीदरम्यान असलेल्या विश्रांतीच्या वेळी त्याची रायफल नादुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र त्याबाबत कोणतेही आकांडतांडव न करता शांतचित्ताने त्याने नेमबाजी केली व सुवर्णपदक जिंकले. यंदा रिओ येथे प्राथमिक व अंतिम फेरीदरम्यान त्याने ज्या खुर्चीवर त्याची रायफल ठेवली होती. ती खुर्चीच पडली. या वेळीही अभिनव हा शांतच राहिला. त्याचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. मात्र त्याने आपल्या अपयशाबद्दल कोणालाही जबाबदार धरले नाही व आपली चूक मान्य केली. एवढेच नव्हे तर स्पर्धात्मक नेमबाजीतून निवृत्त होण्याचे संकेतही त्याने दिले. त्याचा हा खिलाडूपणा अन्य खेळाडूंसाठी प्रेरणादायकच आहे.
भारतीय खेळाडू कोठे कमी पडतात हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. शासकीय निधी, क्रीडा क्षेत्रातील करिअर, पालकांचे सहकार्य, प्रशिक्षकांचा दर्जा, देशातील स्पर्धाची स्थिती, क्रीडा सुविधा व त्यांची देखभाल, खेळाडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, निवडप्रक्रिया, खेळाडूंची वृत्ती, संघटनांचे कार्य आदी अनेक गोष्टी खेळाडूंच्या यशापयशाला कारणीभूत असतात. या प्रत्येक कारणांबाबत सविस्तर ऊहापोह करण्याची गरज आहे. (क्रमश:)
– मिलिंद ढमढेरे
milind.dhamdhere@expressindia.com