रिओ दी जानिरो येथील ऑलिम्पिक स्टेडियममध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जमली होती. वयाच्या ४१व्या वर्षी युवा खेळाडूंना लाजवेल अशा कर्तबगारीने उपस्थितांना अवाक केले. तिने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला, त्या वेळी प्रतिस्पर्धी खेळाडूंपैकी बहुतेक जणी जन्मल्याही नव्हत्या, तरीही त्याच जोशात आणि त्याच खुबीने ती जिम्नॅस्टिकमधील कलात्मक आणि आव्हानात्मक प्रकार करत होती. उझबेकिस्तानच्या ओक्साना चुसोव्हिटीनाची ही कहाणी.
जिम्नॅस्टिक स्पध्रेतील सर्व प्रकार खुबीने पूर्ण केल्यानंतर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिला दाद दिली. या स्पध्रेचा निकाल तिच्या बाजूने होता की विरोधात, याची काहीच कल्पना सामान्य प्रेक्षकांना नव्हती. पण या निकालापेक्षा मिळालेली दाद ही तिच्या जिद्दीसाठी होती. चाळिशी पार केलेल्या महिलेच्या जिम्नॅस्टिकसारख्या किचकट आणि खऱ्या अर्थाने शारीरिक कसोटी पाहणाऱ्या खेळातील योगदानासाठी होती. त्याहून पलीकडे मुलासाठी आईने घेतलेल्या परिश्रमाची ती पोचपावती होती.
१४ वर्षांपूर्वीची गोष्ट. २००२ मध्ये बुसानमधील स्पर्धा पूर्ण करून परतीच्या मार्गावर असलेल्या ओक्सानाचा फोन खणखणला. समोरून आईचा गंभीर आवाज ऐकून ओक्सानाच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली. ओक्सानाचा तीन वर्षांचा मुलगा अॅलीशेरला रक्ताच्या उलटय़ा होऊ लागल्या आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण हे प्रकरण त्याहून गंभीर होते. त्याला ल्युकेमिया (कर्करोगसदृश आजार) झाल्याचे निदानात स्पष्ट झाले होते. हे ऐकल्यावर ओक्सानाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या वेळी तिच्यासोबत पती बख्तियर कुर्बानोव्ह होते. त्याने तिला धीर दिला. या आजारात रक्ताच्या पांढऱ्या पेशी आवश्यकतेपेक्षा अधिक वाढतात आणि त्याचे निदान न झाल्यास मृत्यू अटळ असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. एका महिन्यात उपचार न झाल्यास मुलाचा मृत्यू होईल, या वाक्याने तिचे अवसान गळले. आपल्या देशात या रोगाचे निदान होणार नाही याची कल्पना तिला होती. त्यासाठी तिला जर्मनीतील कोलोग्ने शहरात जावे लागणार होते आणि उपचारासाठी ९० हजार पौंडाचा खर्च सांगण्यात आला होता. कोलोग्ने शहरातील डॉक्टरांनी उपचार करण्याची तयारी दर्शवली, परंतु सुरुवातीला पैसे भरण्याच्या अटीवर ते अडून बसले. काय करावे, तिला काहीच कळत नव्हते. ओक्साना आणि बख्तियर यांनी राहते घर, दोन चारचाकी गाडय़ा विकल्या. काही क्रीडा संघटनांनी, जिम्नॅस्टिक महासंघाने आणि उद्योजकांनी आर्थिक मदत केली, परंतु तिही अपुरी होती. त्याच काळात तिच्यासमोर जर्मनीकडून खेळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तिने मुलासाठी हा प्रस्ताव त्वरित मान्य केला. मात्र उझबेकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांची मनधरणी करण्यासाठी ओक्सानाने हातपाय जोडले, अक्षरश: भीक मागितली.
‘‘जर्मनीकडून खेळण्याचा निर्णय फक्त आणि फक्त मुलासाठी घेतला. त्याच्यावर जर्मनीतच यशस्वी उपचार होऊ शकत होते. इतर मुलांप्रमाणे त्यालाही खेळताना, हसताना मला पाहायचे होते,’’ असे ओक्साना सांगत होती. जिम्नॅस्टिक या खेळात एकाग्रता फार महत्त्वाची असते. खेळातील विविध प्रकार करताना मनात आलेला प्रत्येक विचार धोकादायक ठरू शकतो. पण ओक्सानाच्या मनात सतत अॅलीशेरचा विचार असायचा. पण, त्याच वेळी तिला हेही माहीत असायचे की, खेळताना काहीही झाले, तर अॅलीशेरच्या उपचारासाठी पैसे गोळा करूच शकत नाही. मानसिक कणखरता दाखवत ओक्सानाने जर्मनीला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये व्हॉल्ट प्रकारात कांस्यपदक जिंकून दिले. त्यापाठोपाठ विश्व अजिंक्यपद स्पध्रेत रौप्य व कांस्यपदक, युरोपियन अजिंक्यपद स्पध्रेत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक तिने जर्मनीला मिळवून दिली. जर्मनीत आल्यानंतर अॅलीशेरवर यशस्वी उपचार करण्यात आले. त्याच्या उपचारासाठी जमा करण्यात आलेल्या रक्कमेतून शिल्लक रक्कम इतर आजारी मुलांच्या उपचारासाठी तिने खर्च केले. आजही ती विविध स्पर्धामधून मिळालेल्या बक्षीस रक्कमेतून गरजू मुलांना आर्थिक मदत करते. अॅलीशेर पुर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर ती मायदेशी परतली आहे आणि ४१व्या वर्षी पुन्हा उझबेकिस्तानच्या झेंडय़ाखाली खेळताना तिला अभिमान वाटतो.
– स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com