‘आयुष्यातील स्वप्नं आणि लक्ष्य आपण जर कागदावर लिहून काढली, तर त्यांच्या पूर्ततेची शक्यता मानसिकदृष्टय़ा अधिक वाढते. जर ही आव्हानं आपण कुणाला सांगितली, तर ती सदैव प्रेरणा देतात,’’ असं अमेरिकन सायकलपटू क्रिस्टिन आर्मस्ट्राँग म्हणायची. पण केवळ प्रेरणादायी वाक्य म्हणण्याइतपत ती अजिबात मर्यादित राहिली नाही. तिनं ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं ध्येय समोर ठेवलं होतं. तिच्या आयुष्यात अनंत अडचणी आल्या, पण तिनं फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वयाच्या सातव्या वर्षीपासून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या ईष्रेनं क्रिस्टिनला झपाटलं होतं. जलतरण या खेळात तिनं शालेय स्तरावरील अनेक स्पर्धा गाजवल्या होत्या. मग १५व्या वर्षी तिची खेळण्याची इच्छाच मावळली. मात्र एका दशकानंतर पुन्हा नव्या स्वप्नानं तिच्या मनाचा ताबा घेतला. ट्रायअ‍ॅथलॉन या खेळात ऑलिम्पिक पदक मिळवण्याची तिची इच्छा होती. मात्र यावेळी पुन्हा तिच्या नशिबानं दगा दिला. पाश्र्वभागाला झालेल्या संधिवातामुळे वयाच्या २७व्या वर्षी (२००१मध्ये) तिला खूप वेगानं धावू नये, असा वैद्यकीय सल्ला देण्यात आला. त्यामुळे तिची ट्रायअ‍ॅथलॉन कारकीर्द संपुष्टात आली. मग मात्र फक्त सायकलिंग या खेळाचा तिनं ध्यास घेतला. ३०व्या वर्षी २००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन आपल्या स्वप्नाच्या दिशेनं तिनं पहिलं पाऊल टाकलं. परंतु तिला आठव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पण तिनं जिद्द सोडली नाही, वयाच्या ३४व्या वर्षी २००८व्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ती पुन्हा सहभागी झाली आणि तिचं ऑलिम्पिक पदकाचं जिवापाड जपलेलं स्वप्न साकार झालं. मग ३८व्या वर्षी लंडन ऑलिम्पिकला दुसरं तर यंदा ४२व्या वर्षी रिओत सलग तिसऱ्या ऑलिम्पिक सुवर्णपदकावर नाव कोरत तिनं आपला ऐतिहासिक ठसा उमटवला आहे. याशिवाय तब्बल पाच जागतिक स्पर्धामध्ये तिनं पदकं जिंकली आहेत.

क्रिस्टिनचे वडील अमेरिकन नौदलात नोकरीला होते, त्यामुळे लष्करी शिस्तीतच तिचं बालपण गेलं. मेमफिसला (टीनीसी) येथे तिचा जन्म झाला, पण वडिलांच्या नोकरीमुळे पुढे कॅलिफोर्निया, उत्तर कॅरोलिना आणि नंतर ओकिनावा (जपान) येथे त्यांच्या कुटुंबाचं स्थलांतर झालं. त्यानंतर अमेरिकेतच तिनं क्रीडा मानसशास्त्र या विषयात १९९५मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलं.

टुर डी फ्रान्स शर्यतीवर बरीच वष्रे अधिराज्य गाजवल्यानंतर उत्तेजकांमुळे कलंकित झालेला लान्स आर्मस्ट्राँगसुद्धा अमेरिकेचाच. क्रिस्टिन ही त्याची पत्नी असल्याचा गैरसमज नामसाधम्र्यामुळे अनेकांचा होतो. पण क्रिस्टिनचा विवाह जो सॅव्होलाशी झाला. मग संसार करण्याच्या इराद्यानं तिनं २००९मध्ये सायकलिंगमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आणि मुलाला जन्म दिला. पण वर्षभरात ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी ती पुन्हा व्यावसायिक सायकलिंगमध्ये परतली. २०११मध्ये पीनट बटर अँड कंपनीकडून सी ऑटर क्लासिक स्पध्रेत सहभागी झाली. या स्पध्रेच्या चार स्तरांपैकी तीन स्तर तिनं जिंकले. मात्र अखेरच्या स्तरावर तिला अन्नातून विषबाधा झाली आणि स्पर्धा अध्र्यावर सोडून तिला घरी परतावं लागलं.

२०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा सुवर्णपदकाचा कब्जा केल्यानंतर तिनं पुन्हा निवृत्तीचा निर्णय घेतला. मग सप्टेंबर २०१२मध्ये जर्मनीहून अमेरिकेला जात असताना तिची ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारी सायकल चोरीला गेली. मात्र ऑलिम्पिकचं स्वप्न तिला स्वस्थ बसू देईना. एप्रिल २०१५मध्ये निवृत्तीचा निर्णय पुन्हा गुंडाळून ती पॅन अमेरिकन अजिंक्यपद स्पध्रेत सहभागी झाली आणि पाहता-पाहता क्रिस्टिन पुन्हा ऑलिम्पिकचं स्वप्न जगत रिओत आली आणि सुवर्णपदक जिंकूनही दाखवलं. अशी ही क्रिस्टिनची कहाणी सफल संपूर्ण.

– प्रशांत केणी

prashant.keni@expressindia.com