ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू व पदाधिकारी हे खरे तर यजमान देशाचे पाहुणे असतात. मात्र ब्राझीलचे ऑलिम्पिक संघटक व तेथील नागरिकही ‘अतिथी देवो भव:’ हा सुविचार सोयीस्कररीत्या विसरले आहेत. तेथील शर्विलकांनी स्पर्धेनिमित्त आलेल्या परदेशी खेळाडू व पदाधिकाऱ्यांना ‘हाथ की सफाई’चा झटका दिला आहे.
ही स्पर्धा रिओ या शहरात आयोजित केली जाणार असल्याचा निर्णय जाहीर झाला, तेव्हा अनेक परदेशी खेळाडूंनी या स्वप्ननगरीविषयी खूप काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. निसर्गरम्य परिसर व सौंदर्यवतींच्या या देशात जाण्यासाठी अनेक जण उत्सुक झाले होते. मात्र येथे आलेल्या परदेशी खेळाडू व पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. स्पर्धेसंबंधित असलेल्या अनेक घटकांना ब्राझिलियन चोरांनी दणका दिला आहे.
स्पर्धेपूर्वी साधारणपणे दोन महिने अगोदर काही स्पॅनिश खेळाडू येथे सराव स्पर्धेत सहभागी झाले होते. स्टेडियमजवळच त्यांचे निवासाचे हॉटेल असल्यामुळे त्यांनी कोणतेही वाहन न घेता चालत जाण्याचा निर्णय घेतला. काही अंतर चालत जात नाही, तोच काही लुटारूंनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू पळवल्या. या घटनेपाठोपाठ जर्मन टेलिव्हिजन कंपनीला असाच धक्का बसला. त्यांची साधनसामग्री असलेला ट्रकच पळवण्यात आला. या घटनेनंतर रिओ येथील संयोजकांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला, मात्र प्रत्यक्षात हा निर्णय कागदावरच असावा किंवा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतीलच काही कर्मचारी चोरीच्या दुष्कृत्यांमध्ये सामील असावेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे निवास असलेल्या इमारतीमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनीच त्यांना हाताशी लागलेल्या अनेक टी शर्ट्स, लॅपटॉप आदी मौल्यवान वस्तू उचलून नेल्या. ऑस्ट्रेलियन संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत ही घटना घडली.
माणसांना उदरनिर्वाहासाठी कोणतेही सन्मानजनक साधन मिळाले नाही तर ते गैरकृत्यांचाच मार्ग स्वीकारतात. ब्राझिलियन नागरिकांची हीच अवस्था झाली आहे. ऑलिम्पिकद्वारे देशाची भरभराट होईल अशी भ्रामक कल्पना त्यांना करून देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या देशाची आर्थिक स्थिती ढासळतच चालली आहे. त्याचेच रूपांतर बेरोजगारीत झाले आहे. शासकीय विभागांमध्ये नोकरीला असलेल्या अनेकांना कित्येक महिने पगार मिळालेला नाही. आर्थिक डबघाईमुळे अनेक सवलतीही काढून घेण्यात आल्या आहेत.
ब्राझील हा देश गुन्हेगारीबाबत खूप बदनाम झाला आहे. त्यातच झिका रोगाचा प्रादुर्भावही वाढला आहे. दुष्काळात तेरावा महिना अशीच तेथे स्थिती झाली आहे, त्यामुळे तेथील स्पर्धा पाहण्यासाठी परदेशी चाहतेही शंभर वेळा विचार करूनच निर्णय घेत आहेत. कोटय़वधी तिकिटे शिल्लक आहेत. त्याचाही परिणाम संयोजनावर बसला आहे. स्वच्छतागृहे, साफसफाई, रंगरंगोटी आदी किरकोळ; परंतु आवश्यक कामावर असलेल्यांनाही पगारासाठी तिष्ठत ठेवण्यात आले आहे. खायची
भ्रांत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी चौर्यकर्माचा मार्ग निवडला नाही तरच नवल. त्यातच कुंपणच शेत खात असल्याची तेथे अवस्था आहे.
‘तुम्ही-आम्ही सगळे खाऊ’ अशीच वृत्ती तेथील सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या स्वयंसेवकांमध्येही दिसून येत आहे.
ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, जर्मनी, स्पेन या देशांच्या खेळाडूंची संयोजकांनी झालेल्या चौर्यकर्माबद्दल जाहीर माफी मागितली आहे, यातच त्यांच्या अगतिकतेचे प्रतीक आहे. स्पर्धा अद्याप दोन आठवडे चालणार आहे, त्यामुळे चौर्यकर्माचे आणखी काही इरसाल नमुने ऐकायला मिळाले नाही, तर नवलच.