रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत १९६४ नंतर प्रथमच कलात्मक जिम्नॅस्टिक्स प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणा-या दीपा कर्माकर या तरूण जिम्नॅस्टिक्सपटूचा आज वाढदिवस. रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्टची अंतिम फेरी गाठत दीपाने इतिहास घडवला आहे. आता हा इतिहास अधिक सोनेरी करण्यासाठी अंतिम फेरीत पदक जिंकण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. दीपाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी सर्व भारतीयांच्या शुभेच्छा तिच्या पाठिशी आहेतच. परंतु, ऑलिम्पिकदरम्यानच तिचा वाढदिवस आल्याने तिच्यावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शुभेच्छा तिला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी नक्की कामी येतील अशी सर्वांना आशा आहे.
व्हॉल्टच्या ‘प्रोडय़ुनोव्हा’ प्रकारात दीपाचा हातखंडा असल्यामुळे तिला हे यश मिळाले आहे. अंतिम फेरीत दीपा तळाच्या म्हणजेच आठव्या स्थानी आहे. या फेरीत तळाच्या स्थानावर असलेल्या खेळाडूला पहिली संधी मिळते. त्यामुळे दीपावर इतर खेळाडूंचे दडपण नसेल. तिने आपला सर्वोत्तम खेळ केल्यास तिच्या कामगिरीनंतर इतरांवर दडपण निर्माण होईल. म्हणूनच दीपाच्या सर्वोत्तम कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली दीपा ही पहिली भारतीय जिम्नॅस्टिक्सपटू आहे. २०१४च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दीपाने कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. १९५२मध्ये दोन, १९५६मध्ये तीन आणि १९६४मध्ये सहा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे तब्बल ५२ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी दीपा कोणता पराक्रम दाखवते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.